घरीच विलगीकरण

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाचा संसर्ग आता राजकीय वर्तुळालाही होऊ लागला असून  देवळा तालुक्यातील भाजप लोकप्रतिनिधींचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. याआधी जिल्ह्य़ातील दोन लोकप्रतिनिधींना करोनाचा संसर्ग झाला आहे.

संबंधित लोकप्रतिनिधी विविध कार्यक्रमांत व्यस्त होते. करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर त्यांनी काही काळ कार्यालयातून काम केले. त्यानंतर पुरेशी काळजी घेत देवळ्यासह शेजारील चांदवड तालुक्यातही दौरे केले. या कालावधीत त्यांनी विविध बैठका घेतल्या. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस त्यांनी हजेरी लावली होती. दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी स्वत:च आपल्या घशातील द्रव्याची तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांचा तपासणी अहवाल सकारात्मक आल्यावर खबरदारी म्हणून कुटुंबातील अन्य सदस्यांचीही चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल नकारात्मक आला. या पार्श्वभूमीवर संबंधित लोकप्रतिनिधीने सात दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळल्यास स्वत:हून करोनाविषयक चाचणी करून घ्यावी, उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे. विलगीकरणाचा कालावधी संपताच पुन्हा जनतेच्या सेवेस हजर राहू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. जिल्हा परिषदेचे एक पदाधिकारीही करोना संशयामुळे स्वत:हून घरीच सात दिवसांसाठी विलगीकृत झाले आहेत.  याआधी शिवसेना, राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींचे अहवाल करोना सकारात्मक आले होते. त्यापैकी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी करोनामुक्त झाले असून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर उपचार सुरू आहेत.