News Flash

आरोग्य, पाणीप्रश्नाविषयी जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी जागरूक

भुजबळ यांनी आरोग्य विषयक सर्वाधिक म्हणजे १२ प्रश्न उपस्थित केले.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘संपर्क’ संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

चारुशीला कुलकर्णी, नाशिक

नाशिक जिल्ह्य़ात विकासाच्या नावाने गजर करणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांत आरोग्य, पाणी, शेती आणि शिक्षण विषयावर आवाज उठविला. तुलनेत महिला सुरक्षा, बेरोजगारी प्रश्न गौण ठरल्याचे मुंबई येथील ‘संपर्क’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आाले आहे. पाच वर्षांत जिल्ह्य़ातील आमदारांनी विधानसभेत ४७२ प्रश्न विचारले. प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आघाडीवर राहिले. सर्वात कमी प्रश्न जिवा पांडू गावित यांनी उपस्थित केले. घोटाळे-गैरव्यवहाराविषयक ६८ प्रश्न विचारले गेले. हे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांमध्ये सीमा हिरे आघाडीवर राहिल्या विधानसभा अधिवेशनात आमदार नेमके कोणते प्रश्न मांडतात, याचा अभ्यास ‘संपर्क’ संस्थेतर्फे करण्यात आला. राज्यातील नऊ अल्प मानवविकास निर्देशांक असलेल्या जिल्ह्य़ांना केंद्रस्थानी ठेवत संस्थेने काही निष्कर्ष काढले आहेत. यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. नाशिक जिल्ह्य़ात १५ मतदारसंघ असून यामध्ये चार महिला आमदार आहेत. पाच वर्षांत जिल्ह्य़ातून ४७२ प्रश्न विचारले गेले. यामध्ये सर्वाधिक प्रश्न (३७) हे आरोग्यविषयक होते. त्याखालोखाल पाणी (३६), शेती (३४), शिक्षण (३२) प्रश्न विचारले गेले. महिला (आठ) आणि बेरोजगारीविषयी केवळ पाच प्रश्न उपस्थित झाले. छगन भुजबळ यांनी सर्वाधिक म्हणजे ८१ प्रश्न उपस्थित केले. त्याखालोखाल निर्मला गावित यांनी ६५ प्रश्न विचारले. या दोघांसह १० आमदारांची प्रश्नसंख्या दोन अंकी आहे. जीवा गावित यांनी एकच प्रश्न मांडला. एक अंकी प्रश्नसंख्या असणाऱ्यांमध्ये दिंडोरीचे नरहरी झिरवाळ, चांदवडचे डॉ. राहुल आहेर, नाशिक पूर्वचे  बाळासाहेब सानप यांचा समावेश आहे. भुजबळ यांनी आरोग्य विषयक सर्वाधिक म्हणजे १२ प्रश्न उपस्थित केले. निर्मला गावित यांनी बालकांविषयक चार, तर दीपिका चव्हाण यांनी महिलांविषयी चार प्रश्न उपस्थित केले. पाच वर्षांच्या कार्यकाळात धोरणविषयक एकही प्रश्न उपस्थित झालेला नाही. जिल्ह्य़ातून घोटाळे-गैरव्यवहारविषयक ६८ प्रश्न उपस्थित झाले. हे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांमध्ये सीमा हिरे आघाडीवर होत्या.  पाच वर्षांत सिंहस्थ कुंभमेळा २०१५-२०१६ साठी राज्य शासनाने मंजूर केलेला निधी, निफाड तालुक्यात बिबटय़ांचे मानवी वस्तीवर होणारे हल्ले, मालेगाव तालुक्यात तयार कापडासाठी प्रक्रिया उद्योग, येवला येथे रेशीम पार्क, मौजे चाटोरीतील पूरपीडितांसाठी गावठाण, गोदावरी प्रदूषण, नाशिक विमानतळावरून विमान उड्डाण का नाही, द्राक्षबागांना वीजपुरवठा, रोहित्र खरेदीतील नियमबाह्य़ता, श्रावणबाळ अर्थसाहाय्य योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, शहरातील दुचाकी चोरी आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

आमदारांची उपस्थिती

विधानसभा कार्यकाळात १०० टक्के उपस्थिती बागलाणच्या दीपिका चव्हाण यांची आहे. राज्यातील २८८ आमदारांमध्ये त्या पहिल्या क्रमांकावर आहेत. मालेगावचे असिफ रशीद ९४ टक्के, सिन्नरचे राजाभाऊ वाजे ९३,  दिंडोरीचे नरहरी झिरवाळ ८७, देवयानी फरांदे आणि योगेश घोलप ८६, बाळासाहेब सानप ८२, जीवा गावित ८१, निर्मला गावित ८०, सीमा हिरे ७७, अनिल कदम ७६, पंकज भुजबळ ७६,  डॉ. राहुल आहेर ६९ टक्के सरासरी उपस्थिती राहिली. सर्वात कमी उपस्थिती छगन भुजबळ यांची ४३ टक्के आहे. सक्तवसुली संचालनालयाने बेहिशेबी मालमत्तेवरून त्यांना अटक केली होती. जवळपास दोन वर्षे ते कारागृहात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:13 am

Web Title: public representatives aware of health water issues in the district zws 70
Next Stories
1 कामगारांची संख्या आणि कामाचे तासही आटले..
2 सामाजिक विषयांपेक्षा भ्रष्टाचार, घोटाळ्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य
3 ‘मेट्रो निओ’ला राज्य सरकारचा हिरवा कंदील
Just Now!
X