News Flash

महापालिकेकडून चिनी बनावटीच्या प्राणवायू कॉन्संटे्रटरची खरेदी

सदस्यांचे समाधान न झाल्याने पुढील बैठकीत या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

स्थायी समितीच्या सभेत आक्षेप

नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूसज्ज खाटांसाठी होणारी धावपळ लक्षात घेऊन नगरसेवक निधीतून महापालिकेने खरेदी केलेले प्राणवायू कॉन्संटे्रटर हे चिनी बनावटीचे असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. महापालिकेने कोरिअन कंपनीकडे मागणी नोंदविली होती. तिचे एक उत्पादन केंद्र चीनमध्ये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सदस्यांचे समाधान न झाल्याने पुढील बैठकीत या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

सोमवारी स्थायी सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा पार पडली. रेमडेसिविर, प्राणवायू कॉन्संटे्रटर, खासगी रुग्णालयात नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, सातपूर येथे ईएसआय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात न झालेले रूपांतर अशा अनेक मुद्द्यांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

रुग्णालयात खाटा मिळत  नसल्याने रुग्णांची प्राणवायूची  निकड भागविण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी एकूण १२५० प्राणवायू कॉन्संटे्रटर खरेदी करण्याचे निश्चित केले. यातील ६२५ यंत्रे नगरसेवकांकडे, तर ६२५ पालिकेच्या काळजी केंद्रात ठेवली जातील. काही यंत्रे प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने क्रमांक टाकून प्रत्येक नगरसेवकाला पाच यानुसार वितरण सुरू केले. त्यांच्यामार्फत आपापल्या प्रभागातील गरजवंतांना ती मोफत देण्याचे नियोजन आहे.

यंत्र हाती पडल्यानंतर कोरिअन कंपनीची सांगितली जाणारी यंत्रे प्रत्यक्षात चिनी बनावटीची असल्याकडे मनसेचे सलीम शेख यांनी लक्ष वेधले. मध्यंतरी पालिकेच्या रुग्णालयात टाकीतून गळती होऊन प्राणवायूअभावी २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. चिनी बनावटीची यंत्रे वापरताना काही दोष उद््भवल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी वाढत्या मागणीमुळे बाजारात ही यंत्रे मिळत नसताना पालिकेने ही मागणी नोंदविली. कोरिअन कंपनीची यंत्रे मिळणार होती. या कंपनीचे एक उत्पादन केंद्र चीनमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. सभापती गिते यांनी यंत्र खरेदी करण्याआधी सुस्थितीत राहण्याचा कालावधी आणि तत्सम बाबींवर चर्चा झाली होती. या संदर्भात सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याचे त्यांनी सूचित केले.

सातपूर येथील ईएसआय रुग्णालयात करोना रुग्णालय सुरू करण्यात कालापव्यय होत आहे. खुद्द पालिका आयुक्तांनी आदेश देऊनही वैद्यकीय विभागाकडून दिरंगाई सुरू असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. जुने नाशिक भागात लसीकरण केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रामवाडी येथील लसीकरण केंद्रात सकाळी सहा वाजेपासून रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांना ११ वाजता १०० जणांना लस मिळणार असल्याचे सांगितले जाते. उर्वरित नागरिकांना घरी जावे लागते. लसीकरणाच्या नियोजनातील अशा त्रुटींवर मुन्ना हिरे यांनी बोट ठेवले.

खासगी रुग्णालयातील लेखापरीक्षकही संशयाच्या घेऱ्यात

करोनाकाळात खासगी रुग्णालयांमध्ये अधिकची देयके आकारून नागरिकांची सुमारे ५० कोटींची लूट झाल्याचा आरोप करण्यात आला. शासकीय दराने आकारणी व्हावी, यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयात लेखापरीक्षक नियुक्त केले. परंतु ते कधीही रुग्णालयात नसतात. रुग्णालयांशी त्यांनी हातमिळवणी केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी शेख यांनी केली. यावर लेखापाल बी. जी. सोनकांबळे यांनी लेखापरीक्षकांना नियुक्तीवेळी रुग्णालयात हजर राहण्याचे सूचित केल्याचे स्पष्ट केले. मेडिसिटी रुग्णालयाच्या प्रकरणात रुग्णालयासह लेखापरीक्षकावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:56 am

Web Title: purchase of chinese made oxygen concentrator from municipal corporation akp 94
Next Stories
1 आठशे रुपयांच्या उधारीसाठी अपहरण
2 रुग्णांच्या मागणीपेक्षा कमी इंजेक्शन मिळण्याची शक्यता
3 जादा दराने खत विक्री केल्यास कारवाई
Just Now!
X