करोनाकाळात शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळण्यासाठी शासनाने विभागात आतापर्यंत ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यात करोना कालावधीपूर्वी ३१ लाख ४२ हजार २८१ क्विंटल, तर करोनाकाळात आठ लाख ८४ हजार १३२ क्विंटलचा समावेश आहे.

विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये आजपर्यंत झालेल्या कापूस खरेदीची माहिती विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिली. पाच जिल्ह्य़ांमध्ये आजपर्यंत करोना कालावधीपूर्वी एक लाख तीन हजार ६३७ शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यात आला होता. करोना कालावधीनंतर ३३  हजार ७०८ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला. याप्रमाणे विभागात एकूण एक लाख ३७ हजार ३४५ शेतकऱ्यांकडून ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. विभागात आजपर्यंत सर्वाधिक २५ लाख ५५ हजार ६५५ क्विंटलची खरेदी जळगाव जिल्ह्य़ात झाली आहे. त्यानंतर अहमदनगरमध्ये पाच लाख नऊ हजार, धुळे जिल्ह्य़ात साडेचार लाख, नंदुरबार चार लाख ४४ हजार, तर नाशिक जिल्ह्य़ात ६६ हजार ५९३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याचे लाठकर यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्य़ात करोना कालावधीआधी १२२१ शेतकऱ्यांकडून सुमारे ४० हजार क्विंटल, तर यानंतर ७१२ शेतकऱ्यांचा २६ हजार ९६३ क्विंटल असा एकूण एक हजार ९३३ शेतकऱ्यांचा ६६ हजार ५९४ क्विंटल कापूस पणन महासंघामार्फत खरेदी करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्य़ात करोना कालावधीनंतर पणन महासंघाने ८५४ शेतकऱ्यांकडून २९ हजार ४८८ तसेच सीसीआयमार्फत करोना कालावधीआधी आठ हजार ४५५ शेतकऱ्यांकडून दोन लाख ६८ हजार ८८६ क्विंटल, तर करोना कालावधीनंतर चार हजार ८५७ शेतकऱ्यांकडून एक लाख ५१ हजार ६४८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्य़ात कापूस पणन महासंघ आणि सीसीआय यांनी एकूण १४ हजार १५६ शेतकऱ्यांकडून साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. जळगावमध्ये कापूस पणन महासंघाने करोना संकटाआधी २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून जवळपास सात लाख क्विंटल, तर या कालावधीनंतर साडेसात हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून पावणेतीन लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. तसेच सीसीआयमार्फत करोना संकटाआधी १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडून साडेसहा लाख क्विंटल, तर करोना कालावधीनंतर १० हजार शेतकऱ्यांकडून एक लाख ३६ हजार क्विंटल आणि खासगी बाजारात १७ हजार ८८५ शेतकऱ्यांकडून सुमारे सात लाख क्विंटल तसेच करोना कालावधीनंतर ७०१ शेतकऱ्यांकडून २१ हजार ४५० क्विंटल, जळगाव बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी करोना संकटाआधी ९० हजार ४८२ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. या प्रकारे जळगाव जिल्ह्य़ात एकूण ७४ हजार ४९९ शेतकऱ्यांकडून २५ लाख ५५ हजार ६५५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये सीसीआयमार्फत करोना कालावधीपूर्वी १० हजार ५७५ शेतकऱ्यांकडून दोन लाख ७३ हजार ६४८, तर करोनानंतरच्या काळात साडेचार हजार शेतकऱ्यांकडून सवा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

नंदुरबार बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुमारे दीड हजार शेतकऱ्यांकडून १५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला.

या जिल्ह्य़ात सीसीआय आणि बाजार समितीतील व्यापारी या दोघांच्या माध्यमातून १६ हजार ६०३ शेतकऱ्यांकडून साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्य़ात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या जिल्ह्य़ात आजपर्यंत ३० हजार १५४ शेतकऱ्यांचा पाच लाख नऊ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.