साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दसऱ्याचे औचित्य साधत ग्राहकांनी खरेदीचा योग साधल्याने बाजारपेठांना वेगळी झळाळी प्राप्त झाल्याचे अधोरेखीत झाले. घरापासून सुवर्ण दागिन्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तु तसेच वाहन खरेदीत उत्साह पहावयास मिळाला. ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहामुळे एकाच दिवसात कोटय़वधींची उलाढाल झाली. विजयादशमीच्या सणावर तळेगावच्या घटनेनंतर उफाळलेल्या जनक्षोभाचे सावट काही भागात पहावयास मिळाले. समाधानकारक पावसामुळे यंदा ग्रामीण भागात हा सण उत्साहात साजरा झाला. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शहर परिसरात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले. पोलीस आयुक्तालयात शस्त्रपूजन करण्यात आले.

दसऱ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. त्यात गुरूदर्शन, दीक्षा आदी पारंपरिक पध्दतीने विधींचा समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहर परिसरात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले. नवचैतन्याचे प्रतीक असलेल्या आणि रावणावर विजय मिळवत रामाने केलेल्या सीमोल्लंघनाची आठवण म्हणून अनेकांनी घरादाराला झेंडुची तोरणे बांधुन आनंदोत्सव साजरा केला. यंदा झेंडुच्या फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली. साहजिकच त्याचा परिणाम भाव घसरण्यात झाला. आदल्या दिवशी ६० ते ७० रुपये शेकडो दराने उपलब्ध असणारी ही फुले दसऱ्याच्या दिवशी आणखी कमी दरात उपलब्ध झाली. दसऱ्याचा मुहूर्त व्यावसायिकांसाठी पर्वणी ठरला. बाजारपेठेत या निमित्ताने कोटय़वधींची उलाढाल झाली. वाहन क्षेत्र त्यात आघाडीवर राहिले.

चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीसाठी चांगलीच गर्दी झाली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पाडला. त्याचा लाभ घेण्याची संधी कोणी दवडली नाही. शून्य टक्के व्याजदरावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध असल्याने अत्याधुनिक टीव्ही, फ्रिज यांची धडाक्यात खरेदी झाली. बाजारातील उत्साहात सराफ बाजार कुठेही मागे राहिला नाही. गेल्या काही दिवसात प्रती तोळा हजार रुपयाने सोन्याचे भाव कमी झाले. त्यामुळे या दिवशी मुहूर्तावरील खरेदीसह लग्नसराईतील खरेदी अनेकांनी केली. दसऱ्यानिमित्त सराफ व्यावसायिकांनी पेशवेकालीनपासून ते आतापर्यंतच्या आधुनिकतेपर्यंतचे आकर्षक सजावटीत घडविलेले दागिने सादर केले. काहींनी आगाऊ नोंदणी करत सवलतींचा लाभ घेतला. या दिवशी चोख सोने खरेदीचा नेहमीचा कल कायम राहिला. दागदागिन्यांपेक्षा अनेकांनी सोन्याचे बिस्कीट, वेढा याची खरेदी केली. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी सादर केलेल्या योजनांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

शहराप्रमाणे ग्रामीण भागातही उत्साह पहावयास मिळाला. पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. त्याचे प्रतिबिंब या सणोत्सवात उमटले. केवळ इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावे त्यास अपवाद ठरली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडलेली घटना आणि त्यानंतर उफाळलेला जनक्षोभ याचे त्या भागात सावट होते.