19 November 2019

News Flash

मागणी वाढली, पण पुरोहित मिळेना!

पुरोहित वेळेवर मिळेनासे झाल्यामुळे अनेकांनी आधुनिक माध्यमांच्या मदतीने पूजाविधी पार पाडण्याचा मार्ग अनुसरला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चारुशीला कुलकर्णी

गणेशोत्सवात पूजाविधीसाठी पुरोहितांचा भाव वधारला

गणेशोत्सवाची सध्या सर्वत्र धामधूम सुरू आहे. या काळात सत्यनारायण पूजेसह अथर्वशीर्ष पठण, गणेश याग आदी धार्मिक कार्यक्रमांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या धार्मिक विधींसाठी पुरोहितांची आवश्यकता असल्याने एकाच वेळी अनेक ठिकाणांहून त्यांना मागणी असल्याने त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. पुरोहित वेळेवर मिळेनासे झाल्यामुळे अनेकांनी आधुनिक माध्यमांच्या मदतीने पूजाविधी पार पाडण्याचा मार्ग अनुसरला आहे. तर काहींनी महिला पुरोहितांकडून पौरोहित्य करण्याला प्राधान्य दिले आहे.

हिंदू संस्कृतीत पूजा-अर्चना अन्य धार्मिक विधींचे पौरोहित्य ब्राह्मण समाजाकडून पिढीजात केले जात आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात पूजेचे साहित्य तसेच प्रसाद तयार करण्यासाठी वेळ नसेल तर पुरोहितच त्याची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी घेत आहेत. पूजेची अन्य तयारीही साग्रसंगीत होते. गणेशोत्सवात मागणी अधिक आणि पुरोहित कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, गुरुजी ऐन वेळी येत नाहीत, वारंवार पाठपुरावा करूनही गुरुजी अन्य ठिकाणी पूजेत अडकलेले आहेत असा अनुभव यजमानांना येत आहे. काहींच्या बाबतीत ऐन वेळी येण्यास नकार दिला जातो. काही वेळा दक्षिणा वाढवून मागितली जाते, असा सूर काही गणेशभक्त व्यक्त करतात. पूजाविधी रखडू नये म्हणून यजमानांना गुरुजींऐवजी नवमाध्यमांवरील दृक्श्राव्य पूजेचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. यजमान स्वतच पौरोहित्य करीत आहेत. काही वेळा महिला पुरोहितांना पूजेसाठी विचारणा होत आहे.

या संदर्भात विलास सोनार यांनी पुरोहितांच्या अडचणी कथन केल्या. उत्सवात पुजारी वर्गाकडे मोठय़ा प्रमाणात विचारणा होते. आधीच पूजेची तारीख निश्चित करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. पूजा साग्रसंगीत होतेही, पण काही वेळा ती अर्धवट सांगितली जाते की काय, अशी शंका यजमानांच्या मनात येते. गुरुजींना दिवसभरात पाच ते सात ठिकाणी जायचे असल्याने गुरुजींची घाई नित्याची झाली आहे. पौरोहित्य हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्याची खंत सोनार यांनी व्यक्त केली.

पौरोहित्य करणाऱ्या संजय देशपांडे यांनी पुजारी वर्गावर होणारे आक्षेप खोडून काढले. दिवसाकाठी पाच ते सात पूजा होतात. त्यातही वर्षांनुवर्षे यजमान असलेल्या मंडळींचा आग्रह आणि नव्याने येणारी काही आमंत्रणे हे गणित जमत नाही. त्यामुळे सर्वच ठिकाणी जाणे, पूजा करणे शक्य नाही. पूजेसाठी दक्षिणा म्हणून साधारणत ३५० ते ५०० रुपये स्वीकारले जातात. त्यात काहींना पूजेचा प्रसाद येत नसेल तर तो गुरुजींच्या घरून बनवून दिला जातो. मात्र त्यासाठी साहित्य यजमानाने देणे अपेक्षित आहे किंवा स्वत त्या ठिकाणी गुरुजी तो कसा तयार करायचा याची माहिती देतात. त्यातही यजमान जर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर वेळेचे नियोजन कोलमडते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पौरोहित्य करणारे ब्राह्मण बहुतांश गुरुकुल पद्धतीने आलेले आहेत, तर काहींनी निवृत्तीनंतर व्यवसाय म्हणून पौरोहित्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे पूजा, पूजेची मांडणी, मंत्रोच्चार यावर फरक पडतो. दक्षिणा किती घ्यायची, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. पूजेला साधारणत एक तास लागतो. त्यात यजमानाने काय साहित्य आणले आहे, त्यानुसार पूजा चालते.

– महेंद्र जोशी, पुरोहित

First Published on September 19, 2018 3:25 am

Web Title: purohit prices rose for ganpati festival
Just Now!
X