रामकुंड परिसरातील निर्माल्य विल्हेवाटीची जबाबदारी पुरोहित संघाने घेण्याची सूचना

शहरातून वाहणाऱ्या गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी चाललेल्या विविध प्रयत्नांतर्गत रामकुंड परिसरात निर्माल्य, पिंडदानाच्या साहित्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाने स्वीकारावी, अशी सूचना उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे.

गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी दाखल याचिकेत न्यायालयाने आजवर अनेक आदेश दिले असून ‘निरी’ने विविध शिफारसी केल्या आहेत. त्यांच्या अंमलबजावणीच्या सद्य:स्थितीबाबत झालेल्या बैठकीत उपरोक्त विषय मांडला गेला. बैठकीस पालिका आयुक्त तुकाराम मुंढे, ‘निरी’चे संचालक राकेशकुमार, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसीचे अधिकारी, डॉ. प्राजक्ता बस्ते, याचिकाकर्ते राजेश पंडित, वैशाली बालाजीवाले आदी उपस्थित होते.

नाशिक शहराचे अर्थकारण आणि शाश्वत विकास हा गोदावरी नदीवर आधारित आहे. यामुळे गोदावरीसह तिच्या उपनद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि तिचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मुंढे यांनी नमूद केले.   याचिकाकर्ते पंडित यांनी सहा वर्षांत गोदावरीची परिस्थिती सुधारली असून निरीच्या सूचना, उच्च न्यायालयाचे आदेश आणि विभागीय आयुक्तांच्या समितीने वेळोवेळी केलेले आदेश यांचे पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील नाल्यांमधून वाहणारे मलजल बंद करण्याच्या सूचनेवर आयुक्तांनी ती कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे नमूद केले. निरीने सुचविलेल्या सर्व मुद्दय़ांवर महापालिका काम करीत आहे. महापालिका हद्दीत निळ्या, लाल पूररेषेबाबत फलक लावण्यात येतील. पूररेषेच्या हद्दीत बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. कपिलासह सर्व उपनद्यांवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती घेऊन नगररचना विभाग कार्यवाही करणार आहे. गोदावरी आणि तिच्या हद्दी निश्चित करण्याचे कामही होईल. रामकुंड येथे निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे. तसेच इतर ठिकाणी कचरा टाकण्यासाठी वेगळ्या पेटय़ा  ठेवण्याची सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला करण्यात आली. गोदावरी पात्रातील काँक्रीटीकरण काढण्याचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार आहे. भविष्यात मलजल वाहिन्या निळ्या पूररेषेबाहेरील रस्त्याच्या पलीकडे करण्याचे निश्चित झाले. देशभरातील शेकडो भाविक दशक्रिया विधीसाठी रामकुंड परिसरात दररोज येतात. या ठिकाणी पिंडदान आणि तत्सम धार्मिक विधी पार पडतात. निर्माल्य, पिंडदानाचे साहित्य मोठय़ा प्रमाणात जमते. कलशात अनेकदा कचरा असल्याने भाविक निर्माल्य त्यात टाकण्यास तयार होत नाही. अनेकदा ते नदीपात्रात टाकले जाते. त्र्यंबकेश्वरमध्ये काही वर्षांपूर्वी ही स्थिती होती. त्यावर तेथील पुरोहित संघाने जबाबदारी स्वीकारून तोडगा काढला. नाशिकच्या गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाने निर्माल्य, पिंडदानाचे साहित्य याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वीकारल्यास प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येईल हा मुद्दा याच बैठकीत मांडला गेला. या संदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्यावरण विभाग विचारविनिमय करणार आहे.

पिंडदानाने प्रदूषण नाही

पिंडदानाने गोदावरीचे कोणत्याही स्वरूपाचे प्रदूषण होत नाही. उलट जलचर प्राण्यांचे पोषण होते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील मूलभूत फरक आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी वाहती नाही. तिथे कुंड आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदी प्रवाही आहे. निर्माल्य, पिंडदानाचे साहित्य यांची विल्हेवाट लावण्याच्या विषयावर संबंधित यंत्रणांनी चर्चा केल्यास पुरोहित संघ काही तोडगा काढायला तयार आहे. प्रदूषण मुक्तीसह अन्य मुद्दय़ांवर संघाकडे काही योजना आहेत. चर्चेत त्या मांडल्या जातील.

– सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ

सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा

हरित लवादाच्या निर्देशानुसार त्र्यंबकेश्वर येथे पुरोहित संघाने पुढाकार घेऊन निर्माल्य, पिंडदान साहित्य यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच धर्तीवर नाशिकमधील पुरोहित संघदेखील सकारात्मक प्रतिसाद देईल याची खात्री आहे.

– राजेश पंडित (याचिकाकर्ते)