‘नोकरी नाही तर छोकरी नाही’ या सध्याच्या सामाजिक मानसिकतेमुळे वय वाढत असतानाही लग्न जुळविताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची प्रचीती तरुण मंडळी पदोपदी घेत असते. अशा स्थितीत नोकरीची लॉटरी लागणे आणि त्यातही ती शासकीय असेल तर विवाहेच्छुक बेरोजगारांच्या दृष्टीने आकाश ठेंगणे वाटण्यासारखीच बाब ठरते. या मानसिकतेचाही फटका ‘पी.डब्लू.डी. वेब मॅनेजमेंट डिपार्टमेंट’च्या नोकरी फसवणूक प्रकरणात अनेकांना बसला आहे. हे कार्यालय खरोखरच शासकीय आहे की नाही याची खोलवर जाऊन खातरजमा करण्यापेक्षा आंधळा विश्वास ठेवून तेथील नोकरी पदरात पाडून घेण्याचा आततायीपणा अनेकांनी केल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयातील नियुक्ती ही सरकारी नोकरी समजून मग काहींच्या लग्नाच्या रेशीमगाठी जुळण्यास मदत झाली. त्याच्या आधारेच चांगली स्थळे चालत येऊन काहींचे लग्र धुमधडाक्यात झाले. दुसरीकडे या कार्यालयाचा ‘भांडाफोड’ झाल्याचा परिपाक मात्र काहींचे जुळलेले विवाह मोडण्यातदेखील झाला.

‘पी.डब्लू. डी. वेब मॅनेजमेंट डिपार्टमेंट’ हे सरकारी कार्यालय असल्याच्या प्रकल्प प्रमुख भूषण शेवाळेच्या भूलथापांना सर्वसामान्य घरातील बेरोजगार तरुणच नव्हे तर, चांगल्या-चांगल्या असामीदेखील बळी पडल्याचे उघड झाले आहे. पोलीस खात्यात उपनिरीक्षक असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मुलाचाही त्यात समावेश आहे. या कार्यालयात नियुक्ती मिळाल्यावर या अधिकाऱ्याच्या मुलाचा विवाह धुळे येथे धुमधडाक्यात पार पडल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यातील एक शिक्षित तरुणी या कार्यालयात नोकरीस लागली. तिच्या नातेवाईकांनी तिच्यासाठी वर संशोधन सुरू केल्यावर सरकारी नोकरी असलेले मनासारखे स्थळ मिळत नव्हते. मग बेरोजगार परंतु एका उच्चशिक्षित मुलाचे स्थळ त्यांच्याकडे आले. या तरुणीप्रमाणेच पैसे भरून या कार्यालयातील नोकरीसाठी वर मुलाच्या नातेवाइकांनी तयारी दर्शविली. अपेक्षेप्रमाणे त्याला तेथे नियुक्तीपत्र भेटल्यावर दोघांचा वाङ्निश्चय पक्का झाला. मात्र त्यानंतर हे कार्यालय सरकारी नसल्याचे लक्षात आल्यावर हा जमलेला विवाह मोडला.

ज्या शासकीय खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय असल्याचे भासविले गेले त्या सार्वजनिक बांधकाम खात्यात मालेगाव येथे काही काळ काम केलेल्या आणि सध्या नगर जिल्ह्य़ात उपअभियंता म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या ‘सिव्हिल’  पदविकाधारक मुलाचीही या प्रकरणात फसवणूक झाल्याचे सांगितले जाते. काही जणांनी सध्याच्या खासगी नोकरी-व्यवसायाला रामराम ठोकून सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी या बनावट कार्यालयातील नोकरीची कास धरली. तेल गेले अन् तूपही गेले, अशी आता त्यांची अवस्था झाली आहे. या नोकरीसाठी कोणी वडिलोपार्जित शेतजमीन विक्री करून तर कुणी कर्जे काढून आणि कुणी उधार-उसनवारी करून पैशांची तजवीज केली होती. पैशांसाठी देणेकऱ्यांचा तगादा सुरू झाल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. सटाणा नाका भागातील एका गरीब कुटुंबातील ‘बी.ई.सिव्हिल’ झालेला तरुण लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची पुणे येथे तयारी करीत होता. या कार्यालयात सरकारी नोकरी मिळू शकते अशी माहिती त्याच्या वडिलांना मिळाली. त्यानंतर हा अभियंता तरुण पुणे सोडून मालेगावात दाखल झाला. बारामती येथे अभियांत्रिकी पदवीचे त्याचे शिक्षण कसेबसे पार पाडणाऱ्या या कुटुंबाची अजिबात आर्थिक कुवत नव्हती. परंतु आईचे अंगावरील दागिने विक्री करून, कर्ज काढून आणि नातेवाइकांकडून उसनवारी करून या तरुणाने पैसे भरले. या कार्यालयात गुण नियंत्रक अभियंता या पदावर त्याला नियुक्ती मिळाली. बारावीनंतर अभियांत्रिकी पदवीच्या कोणत्या शाखेला चांगले भवितव्य राहील याविषयी प्रवेश घेताना त्याचा गोंधळ उडाला होता. अखेरीस सिव्हिल शाखेची त्याने निवड केली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर सहा महिन्यातच गावात ही ‘तथाकथित’ नोकरी मिळाल्यावर सिव्हिल शाखा निवडीचे मोठे ‘चीज’ झाले अशी त्याची भावना झाली. पण, त्याच्या या आनंदावर विरजण पडले. कामावर गेल्यावर चार-सहा दिवसातच त्याला या बनवेगिरीचा संशय येऊ लागला. त्यानंतर पैसे परत मागण्याचा लकडा त्याने सुरू केला. परंतु शेवाळे याने चालढकल सुरू ठेवली. नातेवाइकांचे पैसे परत करण्यासाठी या तरुणाला नाशिक येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी पत्करावी लागली आहे.

तेलही गेले आणि तूपही..

सोयगाव नववसाहतमधील एम.ए.बी.एड. झालेली एक विवाहिता तालुक्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी करीत होती. ही नोकरी करतानाच घरी शिकवणी घेऊन महिन्याकाठी त्यांना दहा-बारा हजाराचे उत्पन्न मिळत होते. मात्र या संस्थेस कधी अनुदान मिळेल व पूर्ण वेतन कधी सुरू होईल याविषयी अनिश्चितता वाटल्याने या नोकरीला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी ‘पी.डब्लू.डी. वेब मॅनेजमेंट डिपार्टमेंट’ कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती स्वीकारली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वडिलांना निवृत्तीच्यावेळी मिळालेली सर्व रक्कम तसेच मोठय़ा बहिणीने मुलीच्या लग्नाची भविष्यकालीन व्यवस्था म्हणून बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीच्या पावत्या मोडून या शिक्षिकेने नव्या नोकरीसाठी पैशांची व्यवस्था केली. प्रारंभीच्या तीन महिन्यांपर्यंत मिळालेले वेतन नंतर बंद झाले. तसेच या कार्यालयाचा गाशा गुंडाळला गेल्याचे लक्षात आल्यावर तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची अक्षरश: जमीन सरकली. ही नोकरी स्वीकारणाऱ्यांना कार्यालय प्रमुखाने अन्य दुसरा कोणताही उद्योग-व्यवसाय करण्यावर बंदी घातल्याने या शिक्षिकेला शिकवणी घेणेही बंद करावे लागले. त्यामुळे तिच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलाचे शुल्क भरण्याची या कुटुंबाची ऐपत उरली नाही. शुल्क न भरल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही, अशी तंबी शाळेकडून दिली जात आहे. आर्थिक फसवणूक झाल्याने लकवाच्या आजाराने अंथरुणाला खिळलेल्या वडिलांना स्वत:च्या उपचारासाठी आयुष्यभराच्या पुंजीचा काहीच उपयोग होऊ शकत नाही तसेच उद्या बहिणीच्या मुलीचे लग्न जुळले तर तिचे पैसे कसे द्यावेत, हे सांगताना या शिक्षिकेला अक्षरश: रडूच कोसळले.