News Flash

‘भूषण शेवाळे’च्या भरारीची लोणकढी थाप

या भूलथापांना बळी पडलेले बेरोजगार व त्यांच्या नातेवाइकांना मात्र नंतर भ्रमनिरास सहन करावा लागला.

‘भूषण शेवाळे’च्या भरारीची लोणकढी थाप

‘पी.डब्लू.डी. वेब मॅनेजमेंट’ या बनावट शासकीय कार्यालयात भरती करताना बेरोजगारांकडून मोठय़ा प्रमाणावर रक्कम उकळल्यानंतर प्रकल्प प्रमुख आणि शहराजवळील संवंदगाव येथील सामान्य कुटुंबातील भूषण शेवाळे याचे राहणीमान अचानक उंचावले. महागडय़ा गाडय़ा त्याच्या दिमतीला उभ्या राहू लागल्या. त्याच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ झाली. मंत्रालयातही त्याचा वावर वाढला. या स्थितीत एखाद्या गल्लाभरू चित्रपटातील नायकाप्रमाणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपण स्वत:चा उत्कर्ष कसा साधला हे सांगतानाच हा ‘उद्योग’ सुरू करून समाजहिताचे महत्तम कार्य आपण नेटाने चालवले आहे, हे लोकांच्या मनात बिंबवण्याचा खटाटोप त्याने सुरू केला. त्यासाठी ‘संवंदगावच्या युवकाची भरारी’ अशा मथळ्याच्या प्रचारकी थाटातील पुरवण्या स्थानिक व जिल्हा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या. पुलाखालून काही पाणी वाहून गेल्यावर मात्र भूषणच्या भरारीची ही कथा शुद्ध लोणकढी थाप असल्याचे वास्तव आता उघड झाले आहे.
भूषणने दहावीनंतर इलेक्ट्रिकमधील आयटीआयचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर दोन वर्षांची ‘आर्किटेक्चर’मधील पदविका त्याने पूर्ण केली. उच्चशिक्षितांना एखादी नोकरी मिळविताना मोठे अग्निदिव्य करावे लागत असताना जेमतेम शिक्षण घेतलेला भूषण ‘पी.डब्लू.डी. वेब मॅनेजमेंट’ हे बनावट शासकीय कार्यालय थाटत जवळपास सव्वाशे कर्मचाऱ्यांचा ‘बॉस’ बनला. या कार्यालयाच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, विशेष शासकीय, चावडी आदी प्रकल्प राबविले जाणार असल्याचे त्याने भासविले. त्याचाच भाग म्हणून ‘रॉयल हब’ इमारतीमधील भाडेतत्त्वावरील गाळ्यांमध्ये त्याने माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा उभारली. त्यासाठी अत्याधुनिक व महागडी यंत्रणा खरेदी केली. या प्रयोगशाळेद्वारे कृषी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल असे तो सांगत होता. मालेगाव परिसरातील कंत्राटदारांना कामांची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी धुळे किंवा नाशिक येथे जावे लागते. भविष्यात गुणवत्ता तपासणीची सुविधाही या प्रयोगशाळेत उपलब्ध होईल असा दावा तो करीत होता.
या भूलथापांना बळी पडलेले बेरोजगार व त्यांच्या नातेवाइकांना मात्र नंतर भ्रमनिरास सहन करावा लागला. नियुक्त केलेल्या या कर्मचाऱ्यांना प्रारंभी देण्यात येणारे वेतन बंद होणे, कार्यालय बंद करून नंतर भूषणचे गायब होणे यामुळे वस्तुस्थिती उघड झाली. तेव्हा फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र त्याचा कुठे थांगपत्ता लागत नव्हता. भ्रमनध्वनीद्वारेही त्याचा संपर्क होत नव्हता. काहींनी त्याला शोधून आणल्यावर बांधकाम मंत्रालयातील एका तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्याने नोकरीसाठी जमा केलेले हे पैसे घेतल्याचा दावा करणे त्याने सुरू केले. त्यासाठी पंधरा कोटीची रक्कम हा अधिकारी परत करणार असल्यासंबंधी या अधिकाऱ्याच्या नावाचे नोटरीचे कागदपत्रेही तो दाखवू लागला. गेल्या महिन्यात धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या माध्यमातून मुंबईत मंत्र्यांना भेटून मंत्रालयातील या निवृत्त अधिकाऱ्याने आपल्यासह १२० बेरोजगारांची नोकरीच्या नावाने फसवणूक केल्याचे चित्र त्याने रंगविले. मुंबईतील माध्यमांसमोर या प्रकरणाची चौकशी करण्याचा आग्रह त्याने धरला. त्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत भूषण हा स्वत:च या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी केलेल्या तपासात या अधिकाऱ्याच्या नावाने केलेली नोटरीची कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले आहे. नोटरीच्या कागदावर साक्षीदारांची स्वाक्षरी नाही. तसेच मुंबईतील वकिलाची व या निवृत्त अधिकाऱ्याचीदेखील स्वाक्षरी बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी सांगितले.

उच्चपदस्थांच्या कथित भेटींचेही भांडवल
नोकरीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या नातेवाइकांना हा शासकीय उपक्रम असल्याचे भासवत असतांना वृत्तपत्रांमधील जाहिरातींद्वारे प्रचार करताना आपले बिंग फूटू नये म्हणून भूषणने पुरेपूर काळजी घेतली. या जाहिरातींमध्ये शासकीय उपक्रम असा थेट उल्लेख टाळून शासकीय प्रकल्प राबविणारी संस्था असे त्याने नमूद केले. खासगी उपक्रम समजून त्याच्या आग्रहास्तव काही राजकीय नेत्यांनी या कार्यालयास भेटी दिल्या. एका पोलीस अधिकाऱ्याने या ठिकाणी सदिच्छा भेट दिल्याचे सांगण्यात येते. शिवाय काही कर्मचाऱ्यांसह माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांची त्याने मुंबईत भेट घेतली होती. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना प्रकल्पाची माहिती दिल्याचे तो सांगतो. सध्याच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी जवळून पाहता आल्याचा दावाही तो करतो. अशा रीतीने त्याच्या कार्यालयास स्थानिक नेत्यांनी दिलेल्या भेटी व त्याने मंत्रालयातील उच्चपदस्थांच्या घेतलेल्या कथित भेटींचे भांडवल करत वृत्तपत्रांमधील जाहिरातींच्या माध्यमातून त्याचा त्याने खुबीने वापर करवून घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी बारामती येथील ज्या माती परीक्षण प्रकल्पास भेट दिली, ती मूळ संकल्पना आपलीच असल्याची थाप मारण्यासही त्याने मागेपुढे पाहिले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 1:53 am

Web Title: pwd web management scam bhushan shewale
Next Stories
1 अपहारप्रकरणी साहाय्यक कर आयुक्त निलंबित
2 नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी जाहीर
3 लाच स्वीकारणाऱ्या शासकीय रुग्णालयातील तंत्रज्ञास अटक
Just Now!
X