करोना संसर्गात वाढ सुरूच

नाशिक : शहराबरोबर ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात शुक्रवारी सायंकाळपर्यंत करोनाचे नवीन १२३ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या २४९४ वर पोहोचली आहे. एकाच दिवसात नऊ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी ११३ झाली आहे. आतापर्यंत १२१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर सध्या ११६० रुग्ण उपचार घेत असल्याचे डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे आता घरातच विलगीकरण करून उपचार करण्याचे नाशिक महापालिकेने ठरवले आहे.

प्रादुर्भाव रोखण्यात काही अंशी यशस्वी झालेल्या मालेगावमध्ये करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी नव्या रुग्णांची भर पडून जिल्ह्य़ाची एकूण रुग्णसंख्या ४६०० टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. यातील दोन हजार ५९४ रुग्ण उपचाराअंती बरे झाले. करोनामुळे आतापर्यंत २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ५७.७ टक्के इतके आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील ९५ पैकी ११ सकारात्मक, तर ८३ नकारात्मक अहवाल होते. एक अहवाल अनिर्णित आहे. दुसऱ्या टप्प्यात ११५ अहवाल प्राप्त झाले. त्यात बहुतांश रुग्ण मालेगावमधील असून काही सटाणा तालुक्यातील आहेत.

दोन महिन्यांपूर्वी मालेगावमध्ये करोनाचा कहर झाला होता. नंतर प्रशासनाने प्रयत्न करून स्थिती काहीशी नियंत्रणात आणली. नाशिक शहर आणि ग्रामीण भागांत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मालेगावमध्ये पुन्हा नव्याने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. गुरुवारी २० आणि शुक्रवारी नवीन १५ अशा ३५ रुग्णांची भर पडली. उर्वरित रुग्ण नामपूर, त्र्यंबकेश्वर, विंचूर, ओझर, कसबे सुकेणे येथील आहेत. एकूण रुग्णसंख्या ४५९५ वर पोहोचली. सद्य:स्थितीत १८०८ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनामुळे आतापर्यंत नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ११३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ७५, नाशिक ग्रामीणमधील ५० आणि  जिल्ह्य़ाबाहेरील ११ अशा एकूण २४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर बरे झालेल्यांचे प्रमाण मालेगाव शहरात सर्वाधिक म्हणजे ७८.७२ टक्के आहे. कमी प्रमाण नाशिक शहरात ४६.९० टक्के आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ५२.५६, जिल्हा बाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६२.६९ टक्के आहे. जिल्ह्य़ाचा विचार करता हे प्रमाण ५७.०७ टक्के असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. देवळा तालुक्यात करोनाचा उद्रेक झाल्यामुळे जनता संचारबंदीची मुदत १३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

उपचार घेणारे रुग्ण १८०० पार

करोनातून उपचाराअंती बरे होणाऱ्यांबरोबर नव्या रुग्णांची संख्याही विस्तारत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १८०८ वर गेली आहे. सर्वाधिक ११७१ रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रात आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये ८३, चांदवड तीन, सिन्नर ४६, दिंडोरी २९, निफाड ६०, देवळा १७, येवला ३८, त्र्यंबकेश्वर दोन, पेठ दोन, बागलाण १६, कळवण दोन, इगतपुरी २३, मालेगाव ग्रामीण २१ असे हे प्रमाण आहे. सुरगाणा तालुक्यात एकही रुग्ण नाही; परंतु आतापर्यंत करोनामुक्त राहिलेल्या पेठ तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे.