नाशिक : गोदावरी संवर्धन कक्षाचे कामकाज संशयास्पद असून या कक्षाची स्थापना झाल्यापासून प्रदूषण मुक्तीसाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, आजपर्यंत किती टन पानवेली काढल्या, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, या आक्षेपांमध्ये तथ्य नसल्याचे कक्षाने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी गोदावरी पात्राच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले गेले. दूषित पाण्यात पाणवेली फोफावतात. नदीपात्रावर हिरवीगार चादर पसरल्यानंतर ते काढण्याचे काम केले जाते. दूषित पाणी पात्रात जाणार नाही याची दक्षता घेतली जात नाही. मात्र पाणवेली काढण्याचे काम नित्यनेमाने केले जाते, असेच चित्र आहे.

गोदावरी नदी प्रदूषणाबाबत मनपास्तरीय समितीच्या बैठकीत अलीकडेच अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली होती. नाले, उपनद्यांमधून काही वेळेस गटारीचे पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याच्या मुद्दय़ावर प्रशासनाने पुरामुळे गटारीच्या झालेल्या नुकसानीचे कारण पुढे केले होते. गटारीच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार तयार केलेला प्रस्ताव निरीच्या मान्यतेसाठी पाठविला गेला आहे. गोदावरी प्रदूषणाच्या विषयावर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. न्यायालयीन निर्देश, निरीच्या शिफारशीनुसार प्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. शहरातील गोदावरी, नासर्डी, वाघाडी, वालदेवी नद्या प्रदूषणुक्त करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी प्राप्त झालेला आहे. त्याचा विनियोग गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी होणे अपेक्षित असताना गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख, कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा संशय नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

गोदावरी संवर्धन कक्षाचे कामकाज संशयास्पद आहे. साधारणपणे तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची बदली होत असते. परंतु या कक्षात अनेक वर्षांपासून तेच कर्मचारी असल्याने एकाधिकारशाही निर्माण झाली. गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या त्याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गोदावरी संवर्धन कक्षात केवळ तीन ते चार कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपविलेला आहे. कक्षाच्या कार्यपध्दतीवर घेतले जाणारे आक्षेप तथ्यहीन आहेत. गोदावरी स्वच्छ राखण्यासाठी नदीपात्राचे आनंदवल्ली ते होळकर पूल, होळकर पूल ते तपोवन संगम आणि तपोवन संगम ते पंचक असे तीन टप्प्यात वर्गीकरण करण्यात आले आहे. नदीकाठावर दररोज ५० ते ६० हजार भाविक येतात. निर्माल्य, पिंडदानाचे साहित्य संकलित करण्याच्या कामासाठी ठेकेदाराकडून मजूर नियुक्त केले जातात. प्रत्येक टप्प्यात सहा मजूर कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याचे काम करतात. कचरा, पाणवेली काढण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाणवेली दिसतील तिथे बोटीच्या साहाय्याने त्या काढण्याचे काम नियमितपणे केले जाते. पावसाळ्यात वा धरणातून आवर्तन सोडल्यास हे काम थांबवावे लागते. या कामावर पाच विभागीय अधिकाऱ्यांचे लक्ष असते. या कामासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. हजेरीपत्रकानुसार मजुरांना वेतन दिले जाते. गोदावरी काठालगतच्या बंदीत गटारीतून कधीकधी गळती होते. पावसाळ्यात पुरामुळे असे प्रकार घडतात. त्यांची दुरुस्ती प्रगतिपथावर आहे.

– गोदावरी संवर्धन कक्ष