करोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ४९२३ डॉक्टर आणि ६८८ परिचारिका रुग्णसेवेकरिता उपलब्ध झाले आहेत.

विद्यापीठाचा हिवाळी सत्र २०२० मधील वैद्यकीय व बी.एस्सी. (नर्सिंग) अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. वैद्यकीय विद्याशाखेचा (अंतिम वर्ष) ९४.०६ टक्के तर बेसिक बी. एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाचा ७६.५९ टक्के निकाल लागला. अल्पावधीत निकालाचे काम करण्यात आले.  वैद्यकीय विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा आंतरवासिता अभ्यासक्रम करावा लागणार आहे. या काळात ते करोना रुग्णांची सेवा करू शकतील.

याबाबतची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. या निकालांसाठी युद्धपातळीवर नियोजन करण्यात आले. जेणे करून करोनाच्या संकटात प्रशिक्षित मनुष्यबळ लवकर उपलब्ध होईल. करोनाच्या संदर्भात आरोग्य सेवा देण्यासाठी नवीन डॉक्टर, परिचारिकांची आरोग्य यंत्रणेला मदत होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.