News Flash

राज्य शासन म्हणजे ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’

सेना व भाजपने नाशिक शहराच्या शांत प्रतिमेला तडा दिला.

नाशिक महापालिकेसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. समवेत शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव. 

 

राधाकृष्ण विखे यांच्याकडून खिल्ली

जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतांना मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख केवळ मुंबई महापालिकेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. दोन्ही पक्षांनी राजकारणाची खालची पातळी गाठली असून हे सरकार म्हणजे ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’ असल्याची बोचरी टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

महापालिका निवडणुकीसाठी निर्मिलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन गुरूवारी विखे यांच्या हस्ते करण्यात आले.

सेना व भाजपने नाशिक शहराच्या शांत प्रतिमेला तडा दिला. त्याचे प्रतिबिंब महापालिका निकालात उमटेल. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पारदर्शक कारभार आठवला आणि त्यानुसार नाशिक येथे त्याची प्रचिती आली.

कुख्यात गुंड पवन पवारला भाजपमध्ये प्रवेश, निवडणूक तिकीट वाटपावरून भाजपने घेतलेले दोन लाख रुपये यासह अन्य चित्रफितीमधून त्यांच्या पारदर्शक कारभाराची प्रचिती येते, असा टोला विखे यांनी लगावला. पुणे येथे सिंहगडावर पारदर्शक कारभाराची शपथ घेणाऱ्या उमेदवारांनी गडावर जाण्यासाठी ५० रुपयांचे तिकीट घेतले नाही.  असे लोक काय पारदर्शक कारभार करणार? नाशिकच्या उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ कुठे देणार, असा प्रश्नही त्यांनी केला. सेना-भाजप एकमेकांची औकात, कुंडल्या काढण्याचे सांगत आहेत.

प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीत राज्याची जनता त्यांना त्यांची लायकी दाखवेल. काँग्रेस शिवाय राज्याला पर्याय नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवत पक्ष अधिक जागा मिळवेल असेही ते म्हणाले. आघाडी असूनही काँग्रेसचा वेगळा जाहीरनामा का, यावर शहराध्यक्ष शरद आहेर यांनी राष्ट्रवादीने त्यांचा जाहीरनामा छापला, आम्ही आमचा जाहीरनामा छापला. काही मुद्दे समान असल्याचे त्यांनी नमूद केले.

भरमसाठ आश्वासने

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नागरिकांच्या दैनंदिन गरजा व आरोग्यांचे निराकरण, उद्योग, पर्यावरण विकास, गृहनिर्माण, शैक्षणिक, पर्यटन अशा विविध मुद्यांना स्पर्श करण्यात आला आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजा व आरोग्य समस्यांचे निराकरण, सिडको व इतर आवश्यक ठिकाणी सुसज्ज रुग्णालय, महापालिकेची रक्तपेढी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कक्ष, वीजवाहक तारा भूमिगत करणे, स्काय वॉक, गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात सीसी टीव्ही यंत्रणा, शैक्षणिक प्रगतीच्या योजना, पर्यटन व सांस्कृतिक व क्रीडा विकास, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना, बसथांब्यांचे नुतनीकरण, लोकाभिमुख व पारदर्शक कार्यप्रणालीसाठी इ प्रशासन, शहरात जिथे शक्य आहे तिथे सौर ऊर्जा व पवन ऊर्जा केंद्र. उद्योग व रोजगार विषयक व्यवस्था, पर्यावरण विकास, गोदावरी नदीची स्वच्छता, पात्रातील झरे पुनरुज्जीवीत करणे, गृहनिर्माण व झोपडपट्टी विकासात झोपडपट्टीवासीयांना घरे, २०१० च्या आधीच्या सर्व झोपडपट्टीधारकांना पक्की घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:21 am

Web Title: radha krishna vikhe patil maharashtra government
Next Stories
1 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आम्ही जाहीर पाठींबा देऊ- उद्धव ठाकरे 
2 Nashik Mahanagarpalika election 2017 : नाशिकमध्ये प्रचाराची धुळवड अंतिम टप्प्यात ; दिग्गज नेत्यांच्या सभांचा सपाटा
3 प्रचारात शेतकऱ्यांबद्दल राजकीय कळवळा
Just Now!
X