मुसळधार पावसाने महानगरीची दाणादाण उडाली असून नागरिकांचे नाहक बळी गेले. राज्य सरकारची प्रशासनावर पकड राहिली नसून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचा कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाशिकमध्ये केली. सत्तेत असलो तरी पहारेकऱ्याची भूमिका बजावू, असे वक्तव्य करणारे पहारेकरी आता झोपी गेले आहेत काय? असा प्रश्न करत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

मुंबई तुंबली, इमारती कोसळत आहेत याला जबाबदार कोण ? मुंबई महापालिकेत काय चाललंय काय नाही, हे पाहण्यासही राज्य सरकारला वेळ नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय असं म्हणण्याची वेळ आली आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी मुंबईतील इमारती कोसळतात, मुंबई तुंबते, नागरिकांचे नाहक बळी जातात. सर्व सामान्य मुंबईकरांची दयनीय अवस्था होते. मुबंई महापालिकेबरोबरच सत्तारूढ पक्षही या परिस्थितीला तितकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मुबंईतील मिठी नदीमधील नाले सफाईमध्ये अनेक जणांनी आपले हात साफ करून घेतले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबईतील दयनीय अवस्थेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात घराबाहेर पडू नका. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे मनावर घेतलेले दिसतंय असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात नऊ किलोमीटरवर ढग होते. त्यांनी हे अंतर मोजले कसे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बीएमसी यंत्रणेवरील आरजे मलिष्काचे ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ या  व्हायरल झालेल्या गाण्यातील वाक्य आज तंतोतत खरे ठरत आहे. आज मुंबईत खरोखर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी हे गाणं शिवसेनेला चांगलेच झोंबले होते, असेही ते म्हणाले. भ्रष्ट मंत्री सुभाष देसाई आणि प्रकाश मेहता यांच्यावर एसआयटी अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली होती. पण याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जातंय, प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नाही, न्यायव्यस्थेचाही अवमान केला जातोय, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली. भाजप पक्ष शिवसेनेच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी  केला.