News Flash

‘मैत्रेय’च्या पालघर कार्यालयावर छापा

या प्रकरणाचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे.

विविध योजनांच्या माध्यमातून जादा रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील माणिकपुरी येथे ‘मैत्रेय’च्या कार्यालयावर छापा टाकून कंपनीच्या कारभाराची महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली. गुंतवणूकदारांचे पैसे कंपनीने नेमके कुठे गुंतवले याचा शोध घेतला जात आहे. कंपनीच्या दलालांविरुद्ध तक्रारी आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे.
कंपनीच्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना परताव्यासाठी दिलेले धनादेश वटत नसल्याने पाच ते सहा गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मैत्रेय रिअल्टर्स अ‍ॅण्ड प्लॉटर्स स्ट्रक्टर कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका वर्षां सत्पाळकर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी स्थानिक पाच ते सहा गुंतवणूकदारांनी तक्रार दिल्यानंतर कंपनीच्या संचालिका सत्पाळकर (रा. वसई, ठाणे) आणि जनार्दन परुळेकर (वसई) यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीने भूखंड देण्याच्या मोबदल्यात गुंतवणूकदारांकडून काही विशिष्ट रक्कम दरमहा स्वीकारली. परंतु, आश्वासनानुसार सहा महिन्यात भूखंड वितरणासंबंधी पत्र दिले नाही. तसेच गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण होऊन मोबदला व्याजासह न देता फसवणूक केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
एकूण फसवणुकीचा आकडा किती असेल याचा तुर्तास अंदाज बांधणे अवघड असल्याचे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देण्यास प्राधान्यक्रम असून त्या अनुषंगाने कंपनीने पैसे कुठे गुंतवले आहे याचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.
सरकारवाडा पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील माणिकपुरी येथील मैत्रेयच्या कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली. कंपनीच्या कामकाजासंबंधी गुन्ह्यासंबंधी महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले असल्याचे गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा सहभाग आहे काय याची छाननी केली जात आहे. लवकरच हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कंपनीकडून ज्या नागरिकांची फसवणूक झाली असेल, त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:37 am

Web Title: raid on maitreya office in palghar
Next Stories
1 नव्या पिढीने आधुनिक शेतीची कास धरावी – नाना
2 बाजार समिती विरुद्ध किरकोळ विक्रेते यांच्यातील वादास वेगळे वळण
3 ‘मैत्रेय’च्या वर्षां सत्पाळकर यांना पोलीस कोठडी
Just Now!
X