नाशिकहून मुंबईला दररोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची भिस्त असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श बनविण्याचा संकल्प रेल परिषदेने सोडला आहे. या गाडीतील प्रथम श्रेणीच्या बोगीला आदर्श बनवत परिषदेने पंचवटी एक्स्प्रेसला चार वेळा लिम्का बुकमध्ये नामांकन मिळवून दिले. स्वच्छता, सुरक्षितता, शुद्ध भोजन, वेळेवर पोहचविणारी आणि त्रासमुक्त या पंचसूत्रीद्वारे आता संपूर्ण गाडी आदर्श करून तिला ‘रामरथ’ उपाधी देण्याची मागणी परिषदेने रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसशी नाशिककरांचे वेगळे ऋणानुबंध जोडलेले आहेत. प्रदीर्घ काळापासून ही रेल्वेगाडी दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांसह विद्यार्थी व अन्य प्रवाशांसाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. रेल परिषदेने २००९ मध्ये पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श बनविण्याचे स्वप्न बाळगून काम सुरू केले. त्या अंतर्गत प्रथम श्रेणीच्या बोगीतून त्याची सुरुवात करण्यात आली होती. परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी या कामी पुढाकार घेतला.

आदर्श बोगीत स्वच्छता, नीटनेटकेपणा, स्वयंशिस्त राहील याची कटाक्षाने काळजी त्यांच्याकडून आजही घेतली जात आहे. आठवडय़ातून एकदा सीट कव्हर बदलले जाते. बोगीतील सहप्रवाशांच्या विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी दहा मिनिटांचे विचारप्रबोधन अर्थात चालू घडामोडींवर बौद्धिक मार्गदर्शन उपक्रम राबविला जातो. बोगीमध्ये गांधी यांचा आदरयुक्त दरारा असल्यामुळे आणि रेल्वे प्रशासनाशी सलोख्याचे संबंध असल्याने चांगल्या उपक्रमास सर्वाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

आदर्श बोगीतील नित्यक्रमात इगतपुरी ते कसारादरम्यान घरून आणलेला नाश्ता आणि कसारा ते कल्याण दरम्यान बोगीतील दिवे बंद करून आणि भ्रमणध्वनी ‘सायलेंट’ला ठेवून शांततामय वातावरणात आराम, ध्यानधारणा करण्याचे बंधन असल्याने प्रत्येकास दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते, असा प्रवाशांचा अनुभव आहे.

आदर्श बोगीची घडी बसल्यानंतर आता रेल परिषदेने पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श बनविण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. गांधी जयंतीदिनी म्हणजे २ ऑक्टोबरपासून या उपक्रमाची सुरुवात होत असल्याचे बिपिन गांधी यांनी सांगितले.

पंचसूत्रीमध्ये स्वच्छ रेल्वे, सुरक्षित रेल्वे, शुद्ध भोजन, वेळेवर पोहचविणारी आणि त्रासमुक्त रेल्वे असे संकल्प करण्यात आले आहेत. पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श करताना गाडीत फेरीवाले, भीक मागणारे दिसणार नाहीत यासाठी रेल्वेने व्यवस्था करावी, असे साकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे घालण्यात आले आहे.

 

दर सोमवारी राष्ट्रगीत

पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचमध्ये आठवडय़ाच्या सुरुवातीला म्हणजे दर सोमवारी देवळाली स्थानक सोडल्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्याची पद्धत बिपीन गांधी यांनी सुरू केली आहे. यावेळी बोगीतील सर्व प्रवासी उभे राहून सांघिकरित्या राष्ट्रगीत म्हणतात.  काश्मीरमधील शहीद जवानांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. या वेळी नियमित प्रवासी असलेले गांधी यांच्यासह माहिती संचालक शिवाजी मानकर, ठाण्याचे शिक्षण अधिकारी बी. टी. पाटील, पर्यटन महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता माणिक गुट्टे, मुंबई महापालिकेचे अशोक रूपवते व तजुद्दीन शेख, अ‍ॅड्. सागर कासार यांच्यासह खासगी क्षेत्रात काम करणारे दररोज नाशिक-मुंबई प्रवास करणारे नागरिक उपस्थित होते.