पाय घसरून गाडी आणि फलाटाच्या फटीत अडकले

नाशिक : धावत्या रेल्वेमध्ये चढताना पाय घसरून गाडी आणि फलाट यांच्यामध्ये सापडलेल्या वृद्धाला दोन लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांमुळे जीवदान मिळाले. नाशिक रोड रेल्वे स्थानकात ही घटना घडली. सोमवारी सकाळी ११:५० वाजता भुसावळहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारी गोदान एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली. त्या वेळी बी-२ या डब्यातील प्रवासी रियाज अहमद शेख (६७) हे पाणी पिण्यासाठी स्थानकावर उतरले. परंतु गाडी अवघ्या पाचच मिनिटांत सुरू झाल्याने शेख यांच्यासह अन्य प्रवाशांची धावपळ उडाली. गाडीत चढण्यासाठी एकच घाई सुरू झाली.

शेखही चालती गाडी पकडण्यासाठी धावपळ करत होते. गाडी पकडण्याच्या धावपळीत शेख यांचे संतुलन बिघडले. त्यांचा पाय घसरून ते गाडी आणि फलाट यांच्यामध्ये अडकले. गाडी सुरू असल्यामुळे ते घसरत जाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे स्थानकावरील प्रवासी, हमाल आणि इतरांनी आरडाओरड सुरू केली. त्या वेळी स्थानकावर गस्त घालत असलेले लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके यांच्या लक्षात हा प्रकार आला. पोलीस कर्मचारी कुरेशी यांनी विलंब न करता शेख यांच्या कमरेला असलेला पट्टा धरून त्यांना वर ओढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. शेख यांना मुकामार लागला आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विष्णू भोये, पंढरीनाथ मगर, महिला पोलीस उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे, अधिकारी, कर्मचारी यांनी कुरेशी आणि शेडमाके यांचे अभिनंदन केले.