• गोदावरी, दारणाच्या पातळीत पुन्हा वाढ
  • पुरात अडकलेली बस सुरक्षित बाहेर

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा दाखल झालेल्या पावसामुळे धरणातून पाणी सोडावे लागले. त्यामुळे गोदावरीसह दारणा, कडवा, वालदेवी या नद्या दुथडी भरून वहात आहेत. गोदावरीच्या पातळीत वाढ होत असल्याने काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मागील २४ तासांत जिल्ह्यात ५५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान पुरात अडकलेल्या एका प्रवासी बसची सुटका करण्यात अग्शिनमन दलाला यश आले.

मागील तीन ते चार दिवस पावसाने बहुतांश भागातून उघडीप घेतली होती. गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम जिल्ह्यातील काही भागात झाला. गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेली संततधार दुसऱ्या दिवशीही सुरू होती. जिल्ह्यात सर्वाधिक १३५ मिलिमीटर पाऊस पेठ तालुक्यात तर सर्वात कमी चार मिलिमीटरची बागलाणमध्ये नोंद झाली. इगतपुरी (७६) त्र्यंबकेश्वर (४५), दिंडोरी (७३) आणि सुरगाणा (११७) या भागात त्याने दमदार हजेरी लावली.

नाशिक तालुक्यात ११, कळवण १९, नांदगाव २४, येवला ९, चांदवड १८, देवळा ५.८, मालेगाव ५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यतील बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्याचे प्रमाणही नंतर वाढविण्यात आले. गंगापूर धरणातून ३९९७, दारणा ६६१०, कडवामधून ४१७६, पालखेड ३४००, आळंदी २७१६, वालदेवी ५९८ विसर्ग करण्यात आला. गंगापूरमधून पाणी सोडल्यामुळे सकाळपासून गोदावरी दुथडी भरून वाहू लागली.

दरम्यान, गोदावरीच्या पातळीत दुपारी आणखी वाढली. होळकर पुलाखालून दुपारी चार वाजता १३ हजार ०४५ क्युसेक्सचा प्रवाह सुरू होता. काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अग्निशमन दलाची वाहने रामवाडी, मल्हारखाण व काठालगतच्या परिसरात ध्वनिक्षेपकावरून आवाहन करत होते.

सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले. झाडांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार घडले. यामुळे काही भागात वीज पुरवठाही विस्कळीत झाला.

गोदावरीचे पाणी आणखी वाढल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारी प्रशासनाने केली. गोदावरीप्रमाणे दारणा, कडवा, वालदेवीसह छोटय़ा नद्या-नाल्यांनाही पूर आला आहे.

सर्व धरणांतून सोडले जाणारे पाणी नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यालगत गोदावरीला येऊन मिळते. दुपारी या बंधाऱ्यातून जायकवाडीला ४९ हजार ४७८ क्युसेक्सचा विसर्ग सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.