गोदावरी, दारणासह अनेक नद्यांना पूर
जिल्ह्यातील बहुतांश भागात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडविला असून मंगळवारी गोदावरी, दारणा, कादवासह इतर छोटय़ा-मोठय़ा नद्यांना पूर आला आहे. अनेक धरणे तुडूंब भरली असून त्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात आले. नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने काठावरील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला धडपड करावी लागली. दिंडोरी तालुक्यात भिंत कोसळून एक ठार तर एक जण जखमी झाला. निफाड तालुक्यात १३ जण पुराच्या पाण्यात अडकून पडले. पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग उत्तरोत्तर वाढल्याने शहरातील दोन्ही भागांना जोडणारे या नदीवरील बहुतांश पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले. नदी काठालगतच्या भांडी बाजार व सराफ बाजारात पाणी शिरले. सराफी व्यावसायिकांनी सोन्या-चांदीचे दागिने आधीच सुरक्षितस्थळी हलविल्याने नुकसान टळले. सखल भागातील अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरले. या एकंदर स्थितीने गोदावरीच्या २००८ मधील महापूराची सर्वाना पुन्हा एकदा आठवण करून दिली.
रविवारपासून सुरू झालेल्या संततधारेने सोमवारी मध्यरात्रीपासून वेगळे स्वरुप धारण केले. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, कळवण, पेठ व सुरगाणा तालुक्यांत जोरदार पावसाने झोडपून काढले. यामुळे ग्रामीण भागातील अनेक छोटय़ा-मोठय़ा गावांचा संपर्क तुटला. सायखेडा येथील गोदावरी पुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक थांबविण्यात आली. परिणामी, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. पावसाचा वेग वाढल्याने मध्यरात्री तीन वाजता गंगापूर, दारणा, पालखेड, कडवा, पुणेगाव व चणकापूर धरणातील विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे उपरोक्त नद्या धोक्याची पातळी गाठणार असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी रातोरात तालुकास्तरीय यंत्रणांना सतर्क केले. नदीकाठांवरील ग्रामस्थांच्या स्थलांतरासाठी तातडीने प्रयत्न सुरू झाले. शहरात महापालिकेने गोदाकाठावरील रहिवासी व व्यापाऱ्यांना खबरदारी बाळगण्याची सूचना दिली. त्यामुळे नेहमी पूरस्थितीला तोंड देणाऱ्या भांडी बाजार व सराफ बाजारासह आसपासच्या परिसरातील व्यावसायिकांनी दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरूवात केली. पुराचा अनुभव गाठीशी असल्याने सराफ व्यावसायिकांनी दुकानातील सीसी टीव्ही कॅमेरे काढून नेले. पाण्यात ही यंत्रणा निकामी होण्याचा धोका असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. नदीकाठालगतच्या भांडय़ांच्या काही दुकानांमधून साहित्य पुरात वाहून गेले. नदीपात्रातील बहुतांश मंदिरे पुरात दिसेनाशी झाली.
पावसाने शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने महापालिकेसह खासगी शाळांना सुटी जाहीर केली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्यात आले. खासगी व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही घरी सोडण्यात आले. दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने नाशिक व पंचवटीला जोडणारे गोदावरी नदीवरील अनेक छोटे-मोठे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. गंगापूर रस्त्यावरील आसाराम बापू आश्रमालगतचा पूल, रामसेतू व अन्य छोटे पूल पाण्याखाली बुडाले. गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली असताना पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व इतर अधिकाऱ्यांनी स्थितीची पाहणी केली. पालिकेचा अग्निशमन दल वगळता पालिकेच्या इतर यंत्रणा कार्यप्रवण झाल्याचे दिसले नाही. उलट पोलिसांनी रस्त्यावर उतरत गोदावरीकडे जाणारे मध्यवर्ती भागातील बहुतांश रस्ते लोखंडी जाळ्या उभ्या करत बंद केले. अशोक स्तंभ, पंचवटी, रविवार कारंजा, रामवाडी पूल आदी भागातील लहान-मोठय़ा रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली. बहुतांश रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. सखल भागातील घरे व दुकानांमध्ये ठिकठिकाणी पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक इमारतींच्या तळघरात पाणी साचले. गंगापूरमधून विसर्ग वाढत असल्याने काठावरील भागात पाण्याची पातळी उत्तरोत्तर वाढत होती. परंतु, नागरिकांना सूचना देण्याची व्यवस्था केली गेली नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली.
त्र्यंबकेश्वरमध्ये सोमवारी सकाळी पाच ते सहा तासात १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूरमध्ये पावसाचे येणारे पाणी वाढत असल्याने या धरणातून पाण्याचा विसर्गही वाढविला गेला. दुपारी बारा वाजता २१ हजार क्युसेसवर असणारा विसर्ग चार वाजता ३५ हजार क्युसेसपर्यंत वाढविण्यात आला. गंगापूर धरणातून सोडलेले पाणी आणि पावसामुळे धरणाखालील क्षेत्रातून येणारी पाणी यामुळे शहरातून मार्गस्थ होताना गोदावरीने धोक्याची पातळी गाठली. दरम्यान, २००८ मध्ये सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला महापुराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी काठालगतच्या अनेक इमारती, बंगले व दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. सोमवारी त्या महापुराची स्थिती निर्माण झाली.

पाणी पुरवठा विस्कळीत
अतिवृष्टीमुळे शिवाजीनगर आणि गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र तसेच कालिका बुस्टर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या केंद्रांवर पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाणी उचलता आले नाही. त्यामुळे मंगळवारी नाशिक शहरात सर्वच ठिकाणी सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या वीज वाहिनीवर झाड पडल्याने दुपारी दोन तास वीज पुरवठा खंडित झाला. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रावरही तिच स्थिती होती. त्यामुळे पंचवटी विभागातील पाणी पुरवठयावर विपरीत परिणाम झाला. नासर्डी नदीला महापूर आल्याने कालिका पंपींग स्टेशन येथे पूराचे पाणी गेले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे पंपींग होणार नाही. चढ्ढा पार्क जलकुंभावरील इंदिरानगर, साईनाथ नगर भाग तसेच कालिका जलकुंभावरील व भाभानगर जलकुंभावरील परिसरात बुधवार सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तशीच स्थिती शहरातील इतर भागातील पाणी पुरवठय़ाबाबतही राहणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

विक्रमी पावसाची नोंद
मागील चोवीस तासात जिल्ह्यातील काही तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असताना मंगळवारी सकाळपासून त्याचा जोर कायम राहिला. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत नाशिक तालुक्यात १४२ मिलीमीटर, इगतपुरी १२६, त्र्यंबकेश्वर १०७, दिंडोरी ७५, पेठ ८३, निफाड ९०, सिन्नर ८५, चांदवड ९, देवळा १३, येवला ५०, नांदगाव ३१, मालेगाव १६, बागलाण ३९, कळवण १००, सुरगाणा ३४ पावसाची नोंद झाली. धरणांच्या क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाला. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार धरण क्षेत्रांमध्ये सकाळी आठ ते सायंकाळी सहा या बारा तासात गंगापूर धरण क्षेत्रात ४३५ मिलीमीटर, काश्यपी २३५, गौतमी गोदावरी २०८, त्र्यंबकेश्वर १९४, आंबोली २४५ मिलीमीटर पाऊस झाला.

रस्ते जलमय, बाजारपेठेत अघोषित संचारबंदी
शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाल्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. त्याचा परिणाम मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने दिवसभर बंद राहण्यात झाला. गोदावरीच्या काठावर पर्यटकांची गर्दी झाली असताना दुसरीकडे मुख्य बाजारपेठ परिसरात अघोषित बंद पहावयास मिळाला. गोदावरी नदीच्या काठालगतचा बहुतांश परिसर पुराच्या पाण्यात बुडाला. पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली बुडाले. वाहनांचे मार्गक्रमणही अवघड ठरले. एकंदर स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. यामुळे कसेबसे शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घर गाठावे लागले. पाऊस उघडण्याची शक्यता नसल्याने अनेकांनी आपली कामे पुढे ढकलत घराबाहेर न पडणे पसंत केले. दुपारनंतर पावसाचा वेग अधिकच वाढला. गोदावरी नदीवरील बहुतेक पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली. ही स्थिती लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी दुकाने न उघडणे पसंत केले. रविवार कारंजा, मेनरोड, महात्मा गांधी रोड, शालिमार आदी भागातील बहुतांश दुकाने बंद होती. इतर भागातही ग्राहकांची वानवा असल्याने व्यावसायिकांनी सुटी घेणे पसंत केले.

धरणांमधील विसर्ग (दुपारी चार वाजता)
’ गंगापूर धरण – ४२ हजार ६४२
’ दारणा धरण – ३४ हजार ५५०
’ नांदूरमध्यमेश्वर बंधारा – १ लाख २९ हजार क्युसेस
’ पालखेड धरण – ४४ हजार
’ आळंदी – ७६८४
’ वाघाड – ४३१८
’ चणकापूर – १६६६९
’ हरणबारी – ५५४८
’ वालदेवी – १०४०
’ भोजापूर – ७६३०