नाशिक : शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागात गुरूवारी अकस्मात आलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षांसह खळ्यात काढून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. शहरालगतच्या आडगाव परिसरात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. करोना संकटामुळे शेकडो एकरवरील द्राक्ष बागा आधीच उध्वस्त झाल्या असताना नैसर्गिक संकटाने आहे तो मालही गमाविण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. अकस्मात आलेल्या पावसाने बाजार समितीच्या आवारात कृषिमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

मागील एक-दोन दिवसांपासून उकाडय़ाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. तापमानाने ३९ अंशाचा टप्पा ओलांडला. गुरूवारी सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरणत. दुपारी आडगाव, पेठ रोड, पंचवटी, मखमलाबादसह निफाडलगतच्या परिसरात विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आडगाव, माडसांगवी परिसरात गाराही पडल्या. पावसाचा जोर इतका होता की काही वेळातच रस्त्यावरून पाणी वाहू लागले. अकस्मात आलेल्या पावसाने काढणीवर आलेल्या द्राक्षांचे नुकसान झाले. टाळेबंदीमुळे जिल्ह्यातील हजारो एकरवरील द्राक्षांचे आधीच प्रचंड नुकसान झाले आहे. मातीमोल भावातही द्राक्ष खरेदीला कोणी तयार नव्हते. बेदाणा निर्मितीसाठी फारसे कोणी द्राक्ष खरेदी करायला तयार नव्हते. या संकटाने उत्पादक हवालदील झाले असताना अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला. उन्हाळ कांदा काढणीचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. काढलेला कांदा तात्पुरत्या स्वरुपात खळ्यात ठेवला जातो.

अकस्मात आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी कांदा भिजला. शेतकऱ्यांना तो सुरक्षित ठिकाणी नेण्यास उसंत मिळाली नाही. बाजार समितीच्या आवारात पावसाने अशीच तारांबळ उडवली. नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत कृषिमाल, फळांचे लिलाव होतात. अकस्मात आलेल्या पावसापासून कृषिमालाचे संरक्षण करणे शेतकऱ्यांना अवघड ठरले. नांदगाव, मनमाड परिसरात ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पावसाला सुरूवात होईल, अशी स्थिती असल्याने शेतकरी धास्तावला आहे.