राज ठाकरे यांचा आरोप; सरकारवर टीका

राज्यातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांनी सौदेबाजी केल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. या प्रक्रियेत फसवणूक झालेल्या ग्राहकांना संरक्षणाची गरज असताना बांधकाम व्यावसायिकांना अभय कसे देण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रिक्षा परवान्यांच्या विरोधात सुरू केलेले आंदोलन नवीन रिक्षा आल्यानंतर सुरू होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

राज्यातील बेकायदा इमारतींना संरक्षण देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर राज यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अंगलट येणार आहे. कोणती कामे अधिकृत किंवा अनधिकृत हे सरकार कसे आणि कोणत्या मुद्दय़ांवर ठरवू शकते. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची गरज असताना या मंडळींच्या दबावासमोर शासन झुकले. इतक्या घाईघाईत हा निर्णय घेण्यामागे सौदेबाजीसोबत आगामी निवडणुकांचे राजकीय कारणही असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नव्या रिक्षा परवान्यांविरोधात सुरू केलेले आंदोलन थांबविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या संदर्भातील आपल्या सूचनांचा निवडक अंशच लोकांसमोर ठेवून त्याचा विपर्यास करण्यात आला. रिक्षा जाळणे हा मनसेचा कार्यक्रम नाही. सरकारकडून परप्रांतीयांना परवाने देण्याचा जो घाट घातला जात आहे, त्याविरुद्धचा तो राग आहे. शहरांच्या विद्रूपीकरणाला परप्रांतीय जबाबदार आहेत. मराठी युवकांना प्रोत्साहन द्यायचे की बाहेरून आलेल्यांना, असा प्रश्न त्यांनी  केला.