प्रस्तावित इतिहास संग्रहालय जागेची पाहणी
सिंहस्थामुळे चकचकीत झालेल्या नाशिकमधील विकासकामांचा गवगवा करूनही कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उपरोक्त निकालानंतरचा नाशिक दौरा नेहमीप्रमाणे धावताच ठरला. वेळेअभावी एका ठिकाणाला वगळून त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत थेट गंगापूर रस्त्यावरील प्रस्तावित इतिहास संग्रहालयाच्या जागेची अवघ्या काही मिनिटांत पाहणी केली. ‘कडोंमपा’ निवडणूक निकाल वा अन्य काही प्रश्नांवरून उत्तर द्यावे लागू नये म्हणून प्रसारमाध्यमांशी संवाद न साधताच त्यांनी तडक निघून जाणे पसंत केले.
नाशिक हा कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला. परंतु, याच ठिकाणी ज्या वेगात मनसे फोफावली, तितक्याच वेगात पक्षाची वाताहत झाली. नाशिक महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर प्रारंभी कामे होत नसल्याची ओरड होत असल्याने पक्षाला त्याची किंमत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागली. या निकालामुळे सावध झालेल्या मनसेने पालिकेची सत्ता नियोजनपूर्वक राबविण्यास सुरुवात केली. पालिकेची आर्थिक स्थिती यथातथाच असल्याने राज यांनी बडय़ा उद्योजकांना साद घालून नवीन प्रकल्प राबविण्याचे धोरण आखले. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून गोदा उद्यान, टाटा समूहाच्या मदतीने पांडवलेणीच्या पायथ्याशी वनौषधी उद्यान आदींसाठी धडपड सुरू झाली. त्यात हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सोहळा म्हणून ओळखला जाणारा कुंभमेळा मनसेच्या मदतीला धावून आला. विकासकामांसाठी शासनाकडून कोटय़वधी रुपयांचे अनुदान मिळाले. या माध्यमातून नाशिकमध्ये नवीन रस्ते व पूल, पथदीप आदी कामे झाली. नाशिकच्या या बदललेल्या चेहेऱ्याचे विपणन करण्याची संधी मनसेने कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत साधली. या निवडणुकीत मनसेने प्रचारात नाशिकच केंद्रस्थानी ठेवले. अवघ्या साडे तीन वर्षांत नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचा माहितीपट खुद्द राज यांनी ठिकठिकाणी सादर केला. इतके सारे करूनही त्या निवडणुकीत मनसेचे इंजिन काही धावले नाही. या पक्षाला केवळ नऊ जागा मिळाल्या.
‘कडोंमपा’ निवडणुकीत नाशिकच्या विकासाचा गवगवा करूनही फारसे काही साध्य झाले नसल्याने राज यांनी पुन्हा एकवार नाशिककडे लक्ष केंद्रित केल्याचे या दौऱ्याने अधोरेखित झाले. रविवारी नाशिकमध्ये दाखल झालेल्या राज यांचा सोमवारी सकाळी प्रथम वीर सावरकर जलतरण तलाव, तारांगण व हुतात्मा अनंत कान्हेरै मैदानाची पाहणी आणि नंतर गंगापूर रस्त्यावरील इतिहास संग्रहालयाच्या जागेची पाहणी असा कार्यक्रम होता. परंतु, साडे दहानंतरही ते जलतरण तलावाकडे फिरकलेच नाही. ही पाहणी रद्द करत राज यांचा ताफा थेट प्रस्तावित इतिहास संग्रहालयाच्या जागेकडे गेला. या ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत त्यांनी १० ते १२ मिनिटांत पाहणी केली. प्रसारमाध्यमांशी काही न बोलता राज हे आपल्या मोटारीत जाऊन बसले. दरम्यानच्या काळात पुरंदरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर मोटारीचे सारथ्य करत राज हे शिवशाहिरांना फ्रावशी स्कूलच्या हेलिपॅडवर सोडण्यासाठी रवाना झाले. तिथून परतल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून राज मोटारीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. नेहमीप्रमाणे त्यांचा हा दौराही धावताच ठरल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या वर्तुळात उमटली.
शिवशाहिरांकडून प्रशंसा
खास प्रतिनिधी, नाशिक
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे केवळ राजकारणी नाहीत तर ते उत्तम कलाकारही आहेत. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून निर्मिले जाणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक राज्याला नव्हे तर, देशाला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
गंगापूर रस्त्यावरील पालिकेच्या विस्तीर्ण जागेत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केले आहे. या परिसरात तीन ते चार सभागृह असून त्यात पुरातन दुर्मीळ शस्त्रास्त्रांचा संग्रहालयात अंतर्भाव करण्यात येणार आहे. शिवशाहिरांकडे दुर्मीळ शस्त्रास्त्रांचा खजिना आहे. प्रस्तावित संग्रहालयात तो मांडण्याची राज यांची योजना आहे. या अनुषंगाने सोमवारी शिवशाहिरांना गोदावरीच्या काठावरील प्रस्तावित जागा दाखविण्यात आली. यावेळी राज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे टाळले असले तरी शिवशाहिरांनी राज यांचे मनापासून कौतुक केले. गंगापूर रस्त्यावरील विस्तीर्ण जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची मांडलेली संकल्पना अतिशय सुंदर आहे.
या ठिकाणी बाळासाहेबांचे अतिशय भव्यदिव्य स्वरूपात स्मारक साकारता येईल. या प्रकल्पातील इतिहास संग्रहालयात आपल्याकडील दुर्मीळ शस्त्र ठेवले जातील. परंतु, ही शस्त्रे कोणती असतील याबद्दल काही न सांगता त्यांनी संग्रहालय आकारास आल्यावर प्रत्यक्ष पाहण्यास सुचविले. राज ठाकरे हे केवळ राजकारणी नाहीत. ते एक उत्तम कलाकार आहेत, हे विसरून चालणार नाही. कलाकार प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेतून पाहात असतो. या कलाकाराने साद घातल्याने आपण नाशिकला आलो. या प्रकल्पावर कलाकारासोबत काम करणे हे आमचे भाग्य आहे, अशा शब्दात बाबासाहेब पुरंदरे यांनी राज यांची प्रशंसा केली. राज यांच्या संकल्पनेतून आकारास येणारे हे स्मारक देखणे होईल असेही त्यांनी नमूद केले.