News Flash

मनसेला संजीवनी देण्यासाठी ‘राज’मंत्राची अपेक्षा

राज यांच्या संकल्पनेतून अनेक प्रकल्पांची संकल्पना मांडण्यात आली.

मनसेला संजीवनी देण्यासाठी ‘राज’मंत्राची अपेक्षा

‘स्मार्ट सिटी’तील मुद्दय़ांवर भूमिका मांडणार?; आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा

गेल्या पंचवार्षिकमध्ये मनसेने मांडलेल्या नानाविध संकल्पना सत्ताधारी भाजपने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात अंतर्भूत केल्याचा विषय शुक्रवारी मनसे पदाधिकाऱ्यांच्या सकाळी होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्याची तयारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.  मेळाव्यात पक्षाची नेमकी भूमिका राज यांच्याकडून होणार असून येथे मनसेला संजीवनी देण्यासाठी ‘राज’मंत्राची अपेक्षा कार्यकत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये पक्षाने महापालिकेची सत्ताही प्राप्त केली होती. त्या काळात राज यांच्या संकल्पनेतून अनेक प्रकल्पांची संकल्पना मांडण्यात आली. त्यातील काही पूर्णत्वास आले तर काहींना मंजुरी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात महापालिकेत सत्तांतर झाले. भाजपने एकहाती सत्ता मिळवली. लगोलग नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. या योजनेंतर्गत शहराला स्मार्ट करण्यासाठी नावीण्यपूर्ण प्रकल्प साकारण्याचे नियोजन आहे. यासाठी स्थापित प्राधिकरणाने मनसेच्या कार्यकाळात मांडलेल्या संकल्पनांचा प्रामुख्याने अंतर्भाव केला आहे. हा मुद्दा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात कळीचा ठरणार आहे.

विकासकामे करूनही निवडणुकीत मनसेला सत्ता गमवावी लागल्याचे शल्य त्यांनी बोलून दाखविले होते. यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर आजतागायत त्यांनी नाशिकला येणेही टाळले होते. भाजपची सत्ता आल्यानंतर मनसे प्रारंभी विरोधकांसमवेत होती. परंतु, महापालिकेत पुनस्र्थापित करण्यात आलेल्या समितींच्या मुद्दय़ांवर मनसेने वेगळी भूमिका घेत सहा नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपशी जुळवून घेतले. त्यातून आरोग्य समितीचे उपसभापतिपद पदरात पडले. या घडामोडींमुळे महापालिकेत मनसे विरोधी पक्ष म्हणूनही कार्यरत नसल्याचे दिसून येते.

स्मार्ट सिटी योजनेत मनसेच्या अनेक योजना भाजपने समाविष्ट केल्यानंतर मनसेच्या नगरसेवकांनी नक्कल केल्याचा आक्षेप नोंदविला होता. स्मार्ट सिटीतील योजनांचा हा विषय राज यांच्यासमोर मांडला जाणार असल्याचे गटनेते सलीम शेख यांनी सांगितले. मनसेच्या कार्यकाळात शहरात गोदा उद्यान व गोदा काठाचे सुशोभीकरण, रामकुंडावर संगीतमय कारंजा, महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण, उड्डाण पुलाखालील जागेचे सुशोभीकरण, पाथर्डी येथील जैव उद्यान, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय असे अनेक प्रकल्प मांडले गेले. त्यातील काही पूर्णत्वास गेले तर काही प्रगतीपथावर होते. सत्ताधारी भाजपला प्रगतीपथावरील प्रकल्प चांगले आहेत म्हणून स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करणे भाग पडल्याचे शेख यांनी नमूद केले. गोदा उद्यानात ज्या संकल्पना मनसेने मांडल्या, त्याच नाव बदलून आता समोर आणल्या जात आहेत. या घडामोडींची माहिती राज यांच्यासमोर कथन केली जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले. भाजपने नक्कल केलेल्या योजनांबाबत राज हे शुक्रवारी चोपडा लॉन्स येथे होणाऱ्या मेळाव्यात भाष्य करतील, असेही त्यांनी सूचित केले.

भाजपने नक्कल केलेली नाही

मनसेच्या कोणत्याही प्रकल्पाची वा संकल्पनांची नक्कल भाजपने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केलेली नाही. उलट पाच वर्षे सत्ता मिळूनही मनसे कोणतीही विकासकामे करू शकली नाही. यामुळे मतदारांनी मनसेला त्यांची जागा दाखविली. मनसेच्या नगरसेवकांचा त्यांच्यावर विश्वास नसल्याने अनेकांनी पक्षांतर केले. स्मार्ट रस्त्यासह विविध अभिनव संकल्पना भाजपने मांडल्या आहेत.

रंजना भानसी (महापौर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 2:28 am

Web Title: raj thackeray nashik nashik smart city mns
Next Stories
1 महापालिकेच्या कारवाईस कार्यकर्त्यांचेही सहकार्य
2 बंदला संमिश्र प्रतिसाद
3 मुंडन, श्राद्ध, मोर्चाद्वारे नोटाबंदीचा निषेध
Just Now!
X