राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

इगतपुरी : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी युवकाला नोकरी, रोजगारात प्राधान्य मिळाले पाहिजे. निश्चलनीकरणाचे प्रतिकूल परिणाम आपण दोन वर्षांपूर्वीच नमूद केले होते. आजही ते प्रकर्षांने जाणवत आहेत, असे लक्ष वेधताना देशभर, राज्यात भाजप सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे. आगामी निवडणुकीत सरकारला महाराष्ट्रातील जनता नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, राज ठाकरे हे पाच दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी इगतपुरीपासून या दौऱ्याची सुरुवात झाली. विधानसभा मतदार संघनिहाय बैठका घेऊन नियोजन करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दौऱ्यात विविध क्षेत्रांतील प्रमुखांशी ते चर्चा करणार आहेत. इगतपुरी येथील महामार्गावरील शासकीय विश्रामगृहावर राज ठाकरे यांचे  दुपारी  आगमन झाल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष मूळचंद भगत आदी उपस्थित होते.

प्रारंभी त्यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी जवळपास दोन तास चर्चा केली. प्रत्येक घटकाला स्वतंत्र वेळ देऊन तालुक्यातील समस्या, अडचणी जाणून घेत मनसेकडमून काय अपेक्षा आहे याचाही मागोवा घेतला.

तालुक्यातील डॉक्टर, वकील, शेतकरी, धरणग्रस्त, युवावर्ग, वारकरी संप्रदाय, महिला प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, कर्मचारी संघटना, वाहतूक सेना आदींनी शिष्टमंडळाद्वारे राज यांच्याशी अडीअडचणींबाबत चर्चा करून दाद मागितली.

माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महाराष्ट्रात मराठी युवकांना नोकरी, रोजगारात प्राधान्य मिळायला हवे हा मुद्दा मांडला. या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, माजी महापौर अशोक मूर्तडक, प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले, सलीम शेख आदी उपस्थित होते.