ज्यांना शेतकऱ्याविषयी कणव आहे, त्या प्रत्येकाला ‘समृद्धी’ विरोधात लढणाऱ्यांच्या बाजूने उभा राहण्याचा हक्क आहे. बिगर शेतकऱ्यांना बोलण्याचा वा लढण्याचा अधिकार नसल्याचे सांगणारे नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी कठोर शब्दात ताशेरे ओढले.  शेतकऱ्यांच्या नादाला कोणी लागू नये, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी मोजणीच्या मुद्यावरून सिन्नरमध्ये मागील आठवडय़ात निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर, शुक्रवारी खा. शेट्टी यांनी शिवडे गावात भेट देऊन मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. प्रारंभी शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनी शासकीय व पोलीस यंत्रणेकडून आलेले अनुभव सांगत जमिनी गेल्यास ओढावणारी स्थिती कथन केली. जीव गेला तरी एक इंचही जमीन दिली जाणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. यावेळी प्रशासकीय यंत्रणा मोजणीचे काम कशा पध्दतीने करण्याच्या प्रयत्नात आहे याबद्दल माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर खा. शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचा समाचार घेतला.  ज्यांची शेतजमीन जाणार, ते शेतकरी वगळता इतरांना या विषयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कोणी करू शकत नाही. लोकशाही व्यवस्थेत असा कोणताही कायदा नाही. समृध्दी महामार्गासाठी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांना धमकावत आहे. बळाचा वापर करून मोजणीचा प्रयत्न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या नावातील राधा कुठे आणि कृष्ण कुठे जाईल हे समजणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

शेतकऱ्यांशी पंगा घेणे कोणाला परडवणार नसल्यांचे त्यांनी सुनावले. प्रस्तावित मार्गाची पाहणी केल्यावर त्यांनी बागायती क्षेत्रातून हा महामार्ग जाऊ दिला जाणार नसल्याचे सांगितले. वेगवेगळ्या कारणासाठी रस्त्यात बदल केला जातो. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने शेती फुलविली आहे. अशा बागायती क्षेत्राला वगळून पर्यायी मार्गाचा शासनाने अवलंब करावा, असेही त्यांनी सूचित केले.

शेतकऱ्यांच्या व्यथा

मीना हरक यांनी आपल्या कुटुंबात एकूण १८ सदस्य असल्याचे सांगितले. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यामुळे कदापि जागा दिली जाणार नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कोमल हरक हिने आपल्या कुटुंबाची व्यथा मांडली. आपल्या शिक्षणासाठी पालकांना दरवर्षी मोठे शुल्क भरावे लागते. धुळे येथील महाविद्यालयात आपले दोन भाऊ शिक्षण घेतात. निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन शेतात होते. प्रस्तावित समृध्दी मार्गात ही शेती गेल्यास आमचे शिक्षणही धोक्यात येणार असल्याकडे तिने लक्ष वेधले. सोनांबे येथील सत्यभामाबाई पडवळ यांनीही आपली व्यथा मांडली. आपली दोन मुले लग्नाची असून दीड बिघा जमिनीवर कुटुंब चालते. समृध्दीमुळे मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. लक्ष्मण वाघ, पोपट सोनकांबळे, सुभाष हरक आदी शेतकऱ्यांनी समृध्दीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली.