नाजूक आणि फॅन्सी राख्यांना विशेष मागणी

बाजारपेठेत पारंपरिक राख्यांसोबत कुंदन नक्षीकाम, मोती, खडे लावलेल्या फॅन्सी राख्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. लहानग्यांसाठी नेहमीप्रमाणे कार्टुनच्या राख्यांसोबत पब्जीच्या राख्या दाखल झाल्या असून मागील वर्षांच्या तुलनेत यंदा राख्यांच्या दरात थोडी वाढ झाली आहे.

यंदा पर्यावरणपूरक राख्या आणि पारंपरिक राख्यांना महिलांची पसंती मिळत असून पारंपरिक राख्यांसोबतच बहुरंगी धागे, डायमंड वर्क, फॅन्सी, मोती, स्टोन, गोंडय़ाच्या राख्या अशा विविध प्रकारच्या राख्या दोन रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. खरेदी करताना नाजूक आणि फॅन्सी राखीकडे महिलांचा कल अधिक आहे. लहानग्यांसाठी स्पिनर आणि डोरेमॉन, छोटा भीम, मोटू पतलु, कॅप्टन अमेरिका सोबतच पब्जी या लोकप्रिय कार्टून गेमची राखी खरेदी सध्या जोरात सुरू आहे. पब्जी टँक, पब्जी ग्रेनेड राख्यांसाठी बच्चेकंपनी हट्ट करतांना दिसतात.

काही हौशी मंडळींनी अहमदाबादच्या मोती खडय़ांनी सजविलेल्या ‘Rिस्टल‘ राख्यांना पसंती दिली असून या राख्यांची किंमत ३५० रुपयांपासून सुरू आहे. मांगल्याचे प्रतीक असणारे कासव राखी रुपात विक्रीस असून भावाच्या घरी भरभराट यावी यासाठी प्रतिकात्मक कासव फायदेशीर ठरेल यासाठी महिला ही राखी आर्वजून खरेदी करत आहेत. तसेच स्वस्तिक, गणपती, श्रीकृष्ण या देव-देवतांच्या राख्या बाजारात दिसतात. यंदा ‘फोटो राखी’सह भावाचे नाव कोरलेल्या राखीची चलती आहे. बाजूला सोनेरी वर्ख असलेली किनार आणि मध्यभागी आपल्या भावाचे छायाचित्र किंवा देवनागरी अथवा इंग्रजीमध्ये कोरलेले त्याचे नाव असे या राखीचे स्वरूप असून त्यासाठी १५० रुपयांपासून अधिक किंमत मोजावी लागत आहे. यासाठी आगाऊ  नोंदणी आवश्यक असून तरूणींची या राखीला विशेष पसंती लाभली आहे.

याव्यतिरिक्त भय्या, ब्रो, दादा असे लिहिलेल्या राख्या युवावर्गाची पसंत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम यंदा राखीवर झालेला दिसतो. भाजपप्रेमींसाठी खास कमळाच्या प्रतिकृतीच्या राख्यांची विक्री होत असून ७०-८० रुपये किंमत आहे. रक्षाबंधनाचा मुहूर्त यावर्षी स्वातंत्र्यदिनाला आल्याने राख्यांनीही तिरंग्याचे स्वरूप धारण केले आहे. पुरामुळे यंदा बाजारातील राखी खरेदी मंदावली असून अनेक तरुणींनी राख्या खरेदीसाठी विविध ऑनलाईन साईट्सला पसंती दिली आहे. तसेच यावर्षी पुराचा फटका सराफ बाजारालाही बसल्याने रक्षाबंधननिमित्त सोन्या-चांदीच्या राख्यांचे आवकचे प्रमाण नगण्य असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.