‘रेशमाचा बांधूनि धागा’, ‘ताई दादाचं नातं जपू या’, ‘भय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ यासारखी बहीण-भावांच्या प्रेमाची एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत रक्षाबंधननिमित्त आयोजित ‘हे बंध रेशमाचे’ कार्यक्रमात येथील बालनिरीक्षणगृहातील मुला-मुलींचा आनंद बागेश्रीच्या बालकलाकारांनी द्विगुणित केला.
‘तू बुद्धी दे, तू प्रकाश दे’ या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर बागेश्रीच्या गायिका शर्वरी पद्मनाभी, साक्षी झेंडे, जान्हवी पाटील, रुचा झेंडे तसेच आस्था पेखळे यांच्यासह बालनिरीक्षणगृहातील मुलींनी मुलांना राखी बांधली. श्रेया गायकवाडने सूत्रसंचालन केले. संगीत संयोजन चारुदत्त दीक्षित, दीपक दीक्षित यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णा पाटील, कवयित्री स्मिता पद्मनाभी, परिचारिका छाया जोशी यांनी रक्षाबंधनचे महत्त्व मांडले.
अभिनेत्री शर्वरी पद्मनाभीने चारुदत्त दीक्षित रचित ‘हे बंध रेशमाचे’ हे भावगीत, तर जान्हवी पाटीलने ‘बाप्पा तुम्ही या हो’ हे गाणे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 2:14 am