कुठे ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा अखंड सुरू असलेला जयघोष, तर कुठे ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ गीतांवर रंगीबेरंगी फुलांनी सजलेला अलवार हलणारा पाळणा.. कुठे प्रवचन, तर कुठे संगीताची मैफल.. दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांच्या लागलेल्या रांगा.. अशा उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी श्रीराम नवमीचा उत्सव शहर व ग्रामीण भागांत साजरा करण्यात आला. यानिमित्त विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री काळाराम मंदिर देवस्थानतर्फे गुढीपाडव्यापासून वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी मंदिरात रामजन्म सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीना पारंपरिक रत्नजडित आभूषणांसह फुलांनी सजविण्यात आले. विश्वस्तांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले. या वेळी नागपूर येथील चंद्रकांतबुवा वझलवार यांचे कीर्तन झाले. सायंकाळी पूजाधिकारी कुटुंबीयांनी श्रीरामाला ५६ भोग अन्नकोट अर्पण केले. उत्सवकाळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली. या पाश्र्वभूमीवर, सरदार चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजापर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. पंचवटीतील प्राचीन गोरेराम मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सायंकाळी ‘संगीत अयोध्येचा राजा’ या भक्तिसंगीत मैफलीने कार्यक्रमात रंगत आणली.
टाकळी येथील श्री समर्थ रामदास मठ येथील मंदिरात रामजन्म सोहळ्यानंतर प्रकाश पाठक यांचे ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ या विषयावर व्याख्यान झाले.
चेतनानगर येथील श्रीराम मंदिर सेवा समितीच्या वतीने रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला. शनिवारी यानिमित्त परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार असून महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष साहेबराव आव्हाड यांनी दिली. जुने सिडको येथील राम मंदिरात भजन सेवा आणि टिपऱ्यांचे खेळ आदी कार्यक्रम झाले. नसती उठाठेव मित्र परिवाराच्या वतीने आयोजित उत्सवात पुष्कराज भागवत यांचे ‘गीतरामायण’ या कार्यक्रमाने सुरुवात झाली. भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या परिसरातील राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram navami celebration in nashik
First published on: 16-04-2016 at 02:39 IST