‘यूएसजी स्कूल बास्केटबॉल लीग’ स्पर्धा

साताऱ्याची रणजित अकॅडमी, यूएसजी नाशिकरोड, शाईनिंग स्टारसह इतर काही संघांनी राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त नाशिकरोड येथे आयोजित ‘यू.एस.जी. स्कूल बास्केटबॉल लिग २०१८’ स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी महापौर अशोक दिवे यांच्या हस्ते झाले.

युनायटेट सव्‍‌र्हिसेस जिमखाना येथे बास्केटबॉल अकॅडमी, नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघटना आणि मिळा-मेळा परिवार यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पारितोषिक वितरण सोहळ्यास व्यापारी बँकेचे संचालक अशोक सातभाई, सुभाष घिया, नगरसेविका डॉ. सिमा ताजणे, राजेंद्र ताजणे, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे जाकीर सय्यद, रोहन गुजर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेत महाराष्ट्रातील ३७ संघांनी सहभाग घेतला होता.

चौदा आणि १७ वर्षांआतील मुले आणि मुलींच्या गटातील विजेत्या संघांमध्ये रणजित अकॅडमी-सातारा, यूएसजी नाशिकरोड, शाईनिंग स्टार-नाशिक, धुव्र-सातारा, के. एन. केला-नाशिकरोड, गोल्फ क्लब नाशिक, सिक्रेड हार्ट स्कूल-नाशिक, विद्यानिकेतन-डोंबिवली, सेंट झेविअर स्कूल यांचा समावेश आहे. उत्कृष्ट खेळाडू म्हणून करण मोहटा, ईश्वरी संगमनेरे, तन्मय कोकरे, सिध्दी बडकुरे यांना पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच राहुल साळवे यांनी केले.

नाशिकरोड येथे आयोजित यू.एस.जी. स्कूल बास्केटबॉल लीग २०१८ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी माजी महापौर अशोक दिवे, अशोक सातभाई, सुभाष घिया, नगरसेविका डॉ. सीमा ताजणे आदींसह विजेते संघ.