प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन; पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक
स्वतंत्र विदर्भास भाजपचा पाठिंबा असून त्याबाबत विदर्भवासीयांचे जनमत लक्षात घेऊन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. मात्र स्वतंत्र मराठवाडय़ास पक्षाचा विरोध असून राजकारण डोळ्यासमोर ठेऊन कोणत्याही जिल्ह्याचे विभाजन होणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजप ठाम असला तरी मराठवाडय़ाबाबत मात्र पक्षाची भूमिका वेगळी असल्याचे अधोरेखीत झाले.
विविध मुद्यांवरून स्थानिक पातळीवर मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांकडून सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात आहे. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने दोन दिवसीय प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे येथे आयोजन केले. शनिवारी स्वामी नारायण मंदिर सभागृहात या बैठकीस सुरूवात झाली. त्यासाठी भाजपचे डझनभर मंत्री दाखल झाले आहेत. यावेळी दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छोटे राज्य असावे ही भाजपची आधीपासून भूमिका आहे. जेणेकरून प्रशासकीयदृष्टय़ा काम करणे सोपे होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यांची निर्मिती झाली. तेव्हा स्थानिक जनतेने आनंदोत्सव साजरा केला. मात्र काँग्रेसच्या काळात तेलंगणा राज्य निर्मिती करताना रक्तपात झाल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य शासन दुष्काळाचा सामना करण्यास सज्ज असून विरोधी पक्षासह मित्र पक्षांनी एकत्र येत त्यावर चर्चा करून तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्राकडून राज्याला भरघोस मदत मिळाली आहे. त्यातून वीज देयक व शैक्षणिक शुल्क माफी, कमी दरात अन्न धान्याचा पुरवठा हे उपाय योजण्यात आले. शेतकरी आत्महत्येच्या विषयावर पक्षाला राजकारण करायचे नसल्याचे ते म्हणाले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार की नाही, या विषयी स्पष्ट बोलणे टाळत दानवे यांनी त्या बाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचे नमूद केले.

मंदिर प्रवेशाबाबत समानता हवी
शनि शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याबाबत भाजपची भूमिका समानतेची आहे. पुरूषांप्रमाणे महिलांनाही या ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे. मात्र हे प्रकरण चिघळल्यास विश्वस्त मंडळाने प्रयत्न करावेत. त्यांच्याकडून काही झाले नाही तर राज्य सरकार त्यात हस्तक्षेप करेल, अशी पुष्टीही दानवे यांनी जोडली.

कुठे गेला साधेपणा ?
दुष्काळाचे चटके संपूर्ण महाराष्ट्रात सहन करावे लागत असताना भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक मात्र त्यास अपवाद ठरली. दुष्काळामुळे ही बैठक साधेपणाने होणार असल्याचे आधी जाहीर केले होते. परंतु, रणरणत्या उन्हामुळे भाजपने वातानुकूलीत अलिशान सभागृहाची निवड केली. सभागृहाबाहेरची हिरवळ प्रत्येकास प्रफुल्लीत करणारी ठरली. मंत्री महोदय, खासदार व आमदारांना उन्हाच्या झळा बसू नयेत यासाठी निवास व्यवस्थाही वातानुकूलीत राहील, याची दक्षता घेतली गेली. बैठकीस दिमाखात सुरूवात झाल्यानंतर मंत्री व पदाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्पगुच्छांनी करण्यात आले. बैठक स्थळी चर्चेशिवाय दुष्काळ कुठेही जाणवला नाही.