News Flash

सामाजिक लोकशाहीतूनच समताधिष्ठित समाज निर्मिती – रावसाहेब कसबे

हा देश वाचवायचा असेल तर देशात जशी राजकीय लोकशाही आणली, तशी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणावी लागेल.

हा देश वाचवायचा असेल तर देशात जशी राजकीय लोकशाही आणली, तशी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणावी लागेल. हा समाजवाद क्रांतीने नव्हे, हिंसेने नव्हे, तर लोकशाही मार्गानेच आणायला हवा. तसे झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सामाजिक समतेचा समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समकालीन प्रश्न’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप डॉ. कसबे यांच्या उपस्थितीत झाला. व्यासपीठावर विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर, कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे हे होते. समतेच्या पायाशिवाय मनुष्य समरस होऊ शकत नाही.

समरसतेपेक्षा समता आवश्यक आहे, असे डॉ. कसबे यांनी सांगितले. महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित नेहरू यांचे अनेक दाखले देत गांधी समजून घेतल्याशिवाय आंबेडकर आणि आंबेडकर समजून घेतल्याशिवाय देश समजणार नाही, असे नमूद केले. डॉ. आंबेडकर यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विविध समाजांत होत असलेले बदल पाहता ते आता केवळ दलित समाजापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. एकविसाव्या शतकात भारत हा देश यापुढील काळात डॉ. बाबासाहेबांमुळे ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी ‘ओळख कर्तृत्ववान महिलांची’ या प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रा. जे. एफ. पाटील यांनी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकरांनी शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी मोठय़ा आकाराची शेती करणे आवश्यक असून, त्यादृष्टीने सहकारी सामुदायिक शेती आणि शेतीचे राष्ट्रीयीकरण असे विचार मांडल्याचे नमूद केले. जोपर्यंत शेतीची पुनर्रचना होत नाही, तोपर्यंत बदललेल्या जागतिक आर्थिक वातावरणात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे भूत असेच भेडसावत राहील, असा इशाराही त्यांनी दिला

ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय एकात्मता’ या विषयावरील परिसंवादात भारतीय संविधानात अभिप्रेत असलेली देशाची समाज, अर्थ व राज्य अशी व्यवस्था ही या देशातील सर्वसामान्य राबणाऱ्या जनतेची व्हायची असेल तर बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वानी त्यांचे देव्हारे माजवण्याचे प्रकार थांबविले पाहिजे, असे सांगितले. देव्हारे माजविल्यास ते देवघरात बंदिस्त होतील. त्यांच्या विचारांची सामाजिक शक्ती, ऊर्जा दुर्लक्षित होण्याची भीती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम’ या परिसंवादात हैद्राबाद संस्थान विलीनीकरणाचे श्रेय सरदार पटेल यांना दिले जाते हे पूर्णत: खरे नसून, पटेलांइतकेच आंबेडकरांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:18 am

Web Title: raosaheb kasbe comment on indian politics
Next Stories
1 भविष्यात युती करायची की नाही हे शिवसेना ठरवेल- उद्धव ठाकरे
2 शिवसेनेचे आज उत्तर महाराष्ट्र विभागीय शिबीर
3 टेम्पोची दुचाकीला धडक; हवालदार ठार
Just Now!
X