मांसाहाराचे आमिष दाखवत अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी राजेशभाई गमजाभाई एंडाईतला शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या आरोपीवर चार बालिकांवर बलात्कार केल्याचा आरोप असून त्या प्रकरणी वेगवेगळ्या न्यायालयात खटले सुरू आहेत.
देवळा तालुक्यात ३१ डिसेंबर २०१४ रोजी ही घटना घडली होती. भिक्षा मागून रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबास मांस घेऊन देतो असे सांगून एंडाईतने (३२, रा. डांग, गुजरात) तीन वर्षीय बालिकेला सोबत नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.
ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. खटल्यातील कामकाजात विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी एंडाईतच्या इतर गुन्हय़ांची माहिती सादर केली. एंडाईतला २००३ मध्ये बलात्काराच्या गुन्हय़ात सात वर्षांची शिक्षा झाली होती.
शिक्षा भोगून आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्याने जिल्हय़ातील जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत दोन आणि देवळा येथे एक असे एकूण चार बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती सरकारी पक्षाने मांडली. न्यायालयाने एंडाईतला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निर्भया प्रकरणानंतर कायद्यात लागू झालेल्या नव्या तरतुदीनुसार या खटल्याचे कामकाज चालल्याची माहिती सूत्रांनी दिली.