News Flash

उपोषणाची दखल न घेतल्याने रास्ता रोको

पोलिसांची तारांबळ; उपोषणकर्त्यां महिलेची प्रकृती खालावली

उपोषणाची दखल न घेतल्याने रास्ता रोको
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करताना आंदोलक.

पोलिसांची तारांबळ; उपोषणकर्त्यां महिलेची प्रकृती खालावली

झोपडपट्टी परिसरातील घरांना घरपट्टी लागू करावी, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाची कोणीही दखल घेत नसल्याचे पाहून उपोषणकर्त्यांकडून दुपारी कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको करण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांना तेथे धाव घ्यावी लागली. घडलेल्या प्रकाराने पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. या वेळी पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले. सायंकाळपर्यंत धरपकड सत्र सुरू होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांपैकी एका महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गौतमनगर, साठेनगर, रमाबाई आंबेडकरनगर, शांतीनगर परिसरातील झोपडपट्टीतील घरांना घरपट्टी लागू करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचे मनसेच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे. या परिसरात अडीच ते तीन हजार नागरिक राहत असून महापालिकेने घरपट्टी लागू न केल्याने परिसरात वीज, पाणी, गटारी यासह अन्य मूलभूत सोयी-सुविधा अद्याप मिळालेल्या नाही. नागरिकांची यामुळे परवड होत आहे. स्थानिकांनी मनसेच्या मदतीने या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सहा वेळा मोर्चा काढला. पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध म्हणून पुरुष मंडळींनी मुंडणही केले. पालिका प्रशासनाने आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांना घरपट्टी लागू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची आजतागायत अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. त्याची दखलही न घेतल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. हा गदारोळ सुरू असताना अलकाबाई लाठोरे या महिलेची प्रकृती अचानक खालावली. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असून घरपट्टी लागू करण्यासह परिसरातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेत घरे बांधून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची हतबलता, रास्ता रोकोने कोंडी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र हा प्रश्न महापालिकेच्या अखत्यारीत येत असून त्याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगत त्यांनी या विषयातून अंग काढून घेतले, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर आंदोलकांनी मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपडपट्टी परिसरातील जमाव जमा करत रास्ता रोको केले. यामुळे अशोकस्तंभ ते सीबीएसकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. अध्र्या तासाहून अधिक काळ हा रास्ता रोको सुरू होता. सरकारवाडा पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत त्यांना पोलीस ठाण्यात नेले. चार वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2017 1:10 am

Web Title: rasta roko movement in nashik
Next Stories
1 उड्डाणपुलाचे काम दीड वर्षांपासून रखडले
2 सर्प दंशामुळे दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
3 नाशिकमध्येही समृद्धी योजनेत खोडा!
Just Now!
X