एकलहरे येथे प्रस्तावित ६६० मेगाव्ॉट प्रकल्पाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावावे, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी स्थानिक औष्णिक प्रकल्प बचाव संघर्ष समितीने नाशिक-पुणे रस्त्यावर आंदोलन करत तासभर वाहतूक बंद पाडली. या प्रकल्पात सर्व काही सुविधा आधीच उपलब्ध असूनही शासनाच्या उदासीनतेमुळे नवीन प्रकल्पाचे काम रखडले आहे. सध्या कार्यान्वित तीन संचांचे आयुर्मान पुढील काळात संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी प्रस्तावित प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास पंचक्रोशीवर आर्थिक संकट कोसळणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, रास्ता रोकोमुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

एकलहरे औष्णिक वीज प्रकल्प संघर्ष समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी व खासदार रखडलेल्या प्रस्तावित प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. तथापि, राज्य शासन व ऊर्जा विभाग त्याचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. एकलहरे प्रकल्पातील १४० मेगाव्ॉटचे दोन संच आधी बंद पडले आहेत. सध्या सुरू असलेल्या २१० मेगाव्ॉटच्या तीन प्रकल्पांची क्षमता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. ही बाब लक्षात घेऊन २०११ मध्ये राज्य शासनाने ६६० मेगाव्ॉटच्या प्रकल्पास तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र, त्यास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने त्याचे काम पुढे सरकलेले नाही. जमीन, पाणी, रेल्वेमार्ग उपलब्ध असताना शासनाच्या उदासीनतेमुळे त्याचे काम सुरू झाले नसल्याचा आरोप करत पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर फाटय़ावर ठिय्या दिला. सर्वपक्षीय पदाधिकारी त्यात सहभागी झाले. आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडीतून फलक आणले होते.

एकलहरे प्रकल्पात जवळपास १५०० कायमस्वरुपी तर सात हजार रोजंदारी कामगार काम करतात. आसपासच्या लहान-मोठे उद्योग धंदे व व्यवसायांची आर्थिक उलाढाल त्यांच्याशी निगडित आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागू शकतो, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. जुने संच बंद पडल्यास आणि त्याआधी नवीन ६६० मेगाव्ॉट क्षमतेचे संच सुरू न झाल्यास हा प्रकल्प बंद पडू शकतो. यामुळे स्थानिकांवर मोठे संकट कोसळणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. तासभर चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. नाशिक व सिन्नर या दोन्हीकडील मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.