News Flash

‘पद्मावत’विरोधात आज जलसमाधी

हिंदुत्वाच्या नावाने सत्तेवर आलेल्या केंद्र, राज्य सरकारने जनभावनेचा आदर केला नाही.

दीपिका पदुकोण

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा इशारा

‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू असताना नाशिक येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराणा प्रताप क्रांतिदल आदी संघटनांनी आंदोलनाचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. या चित्रपटास परवानगी दिल्यामुळे केंद्र, राज्य शासन आणि सेन्सॉर बोर्डच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी एक वाजता शहरालगतच्या गंगापूर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सतीमाता पद्मावती यांच्या जीवनावर इतिहासाची तोडमोड करून चित्रपटनिर्मिती सुरू असताना राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि समस्त राजपूत संघटनांच्या वतीने संजय लीला भन्साळी यांना शांततेच्या मार्गाने आंदोलनाद्वारे समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळी हा चित्रपट राजपूत समाजाचे इतिहासकार, नेत्यांना दाखविला जाईल, त्यानंतरच सेन्सॉर बोर्डाकडे परवानगी मागितली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. ज्या दोन जणांना हा चित्रपट दाखविला गेला, त्यांनी विरोध दर्शविला असतानाही पैशांच्या जोरावर जनभावनेची कदर न करता चित्रपट प्रदर्शित केला जात असल्याची तक्रार करणी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके यांनी केली.

हिंदुत्वाच्या नावाने सत्तेवर आलेल्या केंद्र, राज्य सरकारने जनभावनेचा आदर केला नाही. जनभावना भडकावण्याचे काम भन्साळीकडून होत असून समाजात अराजकता निर्माण केल्यावरून संबंधिताविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. चित्रपट प्रदर्शित झाल्यास जनता रस्त्यावर उतरेल. त्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ  शकते, असा इशारा देत राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराणा प्रताप क्रांतिदल, महाराणा प्रताप युवा सेना, राजपूत महासंघ, युवा मंच आदी संघटनांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे ठोके, संतोष पवार, नेपालसिंग राठोड आदींनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा, पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आंदोलन न करण्याची विनंती केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, आंदोलनात जिवितहानी झाल्यास त्याला केंद्र, राज्य सरकार, सेन्सॉर बोर्ड, संजय लिला भन्साळी जबाबदार राहतील. त्यामुळे सरकारने जनभावनेची दखल घेऊन या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. या संदर्भात राजकीय नेत्यांनी बाळगलेले मौन आश्चर्यकारक आहे. चित्रपटात नाव वगळता कोणताही बदल झालेला नाही. उलट भन्साळीने पद्मावती या नावाने चित्रपटाची प्रसिद्धी करून घेतल्याचा आक्षेप पदाधिकाऱ्यांनी नोंदविला आहे.

अटक झाल्यास जामीन घेणार नाही

गंगापूर धरण येथे केल्या जाणाऱ्या जलसमाधी आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्यास कोणीही जामीन घेणार नसल्याचे आनंदसिंग ठोके यांनी सांगितले. आंदोलक कारागृहात जातील. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे त्यांनी सूचित केले. या आंदोलनापूर्वी शहर आणि जिल्ह्य़ातील  चित्रपटगृह चालकांना ‘पद्मावत’ प्रदर्शित न करण्यासाठी निवेदने देण्यात आली असून अनेक चालकांनी त्यास होकार दिला. मल्टिप्लेक्समध्ये उपग्रहाधारीत यंत्रणेमार्फत चित्रपट प्रदर्शित होतो. हा चित्रपट एक दिवस आधीच प्रदर्शित करण्याचा निर्मात्याचा डाव असल्याचा आरोपही ठोके यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:44 am

Web Title: rastriya rajput karni sena to take jal samadhi against padmavat
Next Stories
1 लाल कांद्याला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
2 नियमबाह्य़ १६६ मंगल कार्यालये, लॉन्सला नोटीस
3 सत्ताधाऱ्यांना रोजगार, शिक्षणातील अडचणींचा विसर    
Just Now!
X