12 December 2017

News Flash

इगतपुरी तालुक्यात ‘रेव्ह पार्टी’ वर छापा

सात मुलींसह बडय़ा व्यक्तींची धरपकड

प्रतिनिधी, नाशिक | Updated: October 5, 2017 1:06 AM

इगतपुरी तालुक्यातील या हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री रेव्ह पार्टी रंगली होती

सात मुलींसह बडय़ा व्यक्तींची धरपकड

इगतपुरी तालुक्यातील मिस्ट्री हॉटेलमधील ‘रेव्ह पार्टी’ची घटना ताजी असतानाच बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट हॉटेलमध्ये पुन्हा तसाच प्रकार घडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी रात्री या ठिकाणी रंगलेल्या रेव्ह पार्टीत अर्धनग्न अवस्थेत गोंधळ घातला गेल्याने पोलिसांनी सात मुलींसह काही बडय़ा व्यक्तींची धरपकड केली. संशयितांमध्ये पुणे, नाशिक, नगर येथील उच्चभ्रूंचा समावेश आहे.

तालुक्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून पर्यटक येत असतात. त्यातील काही जणांच्या भारतीय संस्कृतीला अशोभनीय अशा वागणुकीमुळे काही घटना घडत असतात. मंगळवारी रात्रीही असाच प्रकार घडला.  महामार्गापासून काही अंतरावर बलायदुरी या ठिकाणी रेन फॉरेस्ट हॉटेल आहे. रात्री तिथे रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. डीजेच्या दणदणाटात बीभत्स नृत्य व अश्लिल हावभाव करीत संशयितांचा गोंधळ सुरू होता. अर्धनग्न अवस्थेत मद्यपान करीत मुले-मुलींचा धिंगाणा सुरू होता. पोलिसांनी लगेच धरपकड सुरू केली. पोलिसांना पाहताच मद्याची झिंग उतरलेल्या काही जणांनी आहे त्या अवस्थेत पळण्याचा प्रयत्न केला. त्यात काही जण यशस्वीही झाले.  घटनास्थळावरून पोलिसांनी पुण्यातील एका कंपनीचा संचालक संशयित प्रशांत सोंडकर (२७, कात्रज), विश्वास सोंडकर (४५, कात्रज), गंगाधर शिंदे (४२, संगमनेर) अनंत भाकरे (५१, कॉलेज रोड, नाशिक) यांना ताब्यात घेतले. उमेश शेवाळे, संजय सोनवणे, प्रथमेश सोनवणे, रामकृष्ण सांगळे, नरेंद्र पाटकर (सर्व रा. नाशिक) हे पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. संबंधितांचा शोध घेतला जात आहे. हॉटेलमधून सात मुलींची सुटका करण्यात आली. कारवाईत देशी-विदेशी मद्यसाठा, डीजे साहित्य, टाटा झेस्ट कार, जीप, काही रोख रक्कम असा सुमारे १० लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दरम्यान, या हॉटेलमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला. हॉटेल मालकाची दहशत असल्याने ग्रामस्थ तक्रारी करण्यास धजावत नसल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे इगतपुरीतील हॉटेल व्यावसायिकांची असभ्य संस्कृती समोर आली. जिल्ह्यत कुठेही कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे आढळून आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

First Published on October 5, 2017 1:06 am

Web Title: rave party raid in igatpuri