‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमात डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचे मत

समाजमाध्यम लोकशिक्षणासाठी महत्त्वाचे आणि तेवढेच प्रभावी साधन आहे. त्यांचा उपयोग विकास संदेशांचे आदानप्रदान करण्यासाठी झाल्यास नागरिकांना लाभ होईल. शिवाय, समाजमाध्यमांचा दुरुपयोग कमी होण्यास मदत होईल, अशी आशा पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त केली.

येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी स्पर्धकांशी सिंगल यांनी संवाद साधला. शासनाच्या विविध योजना, चांगले सामाजिक उपक्रम, शेतकऱ्यांसाठी आवश्यक माहिती आणि चांगल्या विचारांचे आदान-प्रदान समाजमाध्यमातून घडणे गरजेचे आहे. काही घटक या माध्यमाचा चुकीचा उपयोग करून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक करीत आहेत. यामुळे समाज माध्यमांचा वापर करतांना दक्षता बाळगणे गरजेचे आहे. जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका निभवावी. युवा पिढीत समाज माध्यमांविषयी जागृती करण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सिंगल यांनी नमूद केले. संवाद सत्रात जिल्हय़ातील विविध भागांतून आलेल्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे, प्रा. प्राची पिसोळकर, स्वप्निल तोरणे, संतोष साबळे, चंदुलाल शहा, मिलिंद सजगुरे आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

जिल्हास्तरीय संवाद सत्रातून जिल्हय़ाच्या एकूण १४ क्षेत्रांतील प्रत्येकी एका प्रतिनिधीची निवड होणार आहे. प्रसार-माध्यमाचा जबाबदारीपूर्वक वापर व्हावा आणि त्यातून विवेकी समाज घडावा, या उद्देशाने प्रथमच अशा उपक्रमाचे आयोजन राज्यभरात माहिती-जनसंपर्क महासंचालनालयामार्फत केले जात आहे.