News Flash

दुष्काळातही कांद्याची विक्रमी आवक

दुष्काळ असतानाही कांद्याची आवक वाढण्यात शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेततळ्यांचे अधिक योगदान आहे.

पिंपळगाव बसवंत येथे व्यापारी वर्गाने चाळीत कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले आहे. (छाया - हेमंत थेटे)

उन्हाळी कांद्यांचे यंदा अधिक उत्पादन; सुमारे ७० टक्के कांदा चाळी भरल्या

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढत असून गुरुवारी तब्बल ६२ हजार २८०, तर शुक्रवारीही ६० हजार क्विंटलच्या आसपास विक्रमी आवक झाली. यंदा दुष्काळ असतानाही दरवर्षीपेक्षा उन्हाळ कांद्याचे अधिक उत्पादन हाती आल्याचे दिसत आहे. व्यापाऱ्यांनी चाळीत कांदा साठवणुकीला सुरुवात केली असून ७० टक्के चाळी भरल्या गेल्या आहेत. लवकरच उर्वरित चाळी भरल्या जातील, अशी शक्यता आहे. दुष्काळ असतानाही कांद्याची आवक वाढण्यात शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेततळ्यांचे अधिक योगदान आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान ५००, तर कमाल ११६० रुपये भाव मिळाला. इतकी प्रचंड आवक होऊनही सर्व कांद्याचे लिलाव, वजन-मापे करण्यात आली. स्थानिक व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक सुरू केली आहे. यंदा उत्पादन अधिक असल्याने महिनाभरआधीच साठवणूक सुरू झाली आहे. प्रारंभीच्या खरेदी-विक्री व्यवहारात इतकी आवक झाली की, पिंपळगाव बसवंत परिसरात जवळपास ७० टक्के चाळी कांद्याने भरल्या गेल्या. आता केवळ ३० टक्के साठवणूक शिल्लक आहे. मागील वर्षांपर्यंत पिंपळगाव परिसरात ८०० गोदाम होते. यंदा त्यात ४०० गोदामांची भर पडली आहे. जवळपास १२०० कांदा चाळीत कांदा साठविला जाणार आहे.

देशांतर्गत बाजारात दर्जेदार कांद्याला मागणी आहे. निकृष्ट दर्जाच्या कांद्याला मागणी नाही. तसेच दुबई, कोलंबो, मलेशिया आदी ठिकाणी कांदा निर्यात सुरू आहे. यंदा मध्य प्रदेशमधील शहाजपूर खंडवा येथेही कांद्याचे अमाप पीक आहे. इतर भागांतून कांद्याचे प्रचंड उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. कोलकाता भागात उन्हाळी कांद्याचे उत्पादन होत असते. मात्र यंदा पावसामुळे या भागातील पीक खराब झाल्याचे बोलले जाते.

दरम्यान, १५ एप्रिलपर्यंत व्यापाऱ्यांकडून साठवणूक झाल्यानंतर बाजारात चढ-उताराची शक्यता वर्तविली जाते. गेल्या वर्षी कांद्याला चांगले दर मिळाले नव्हते. मागील दोन वर्षांपासून देशांतर्गत गरजेपेक्षा अधिक उत्पादन होत आहे. निर्यातीला चालना मिळत नसल्याने देशांतर्गत भावही उंचावत नाही. या हंगामात काय स्थिती राहील याचा अंदाज उत्पादक बांधत आहे.

कांदा चाळीसाठी अनुदान, कर्जाची अपेक्षा

दिवाळीच्या काळात व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करून भावात तेजी आणण्याची खेळी करतात. दरवर्षी उन्हाळ कांदा विक्री होईपर्यंत मंदी असते. पाऊस पडल्यानंतर हळूहळू दिवाळीपर्यंत कृत्रिम टंचाई निर्माण करून बाजारात तेजी निर्माण केली जाते. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जपुरवठा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कांद्यावर माल तारण कर्ज उपलब्ध करून दिल्यास दिलासा मिळेल, याकडे लक्ष वेधले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:50 am

Web Title: record of onion in the drought season
Next Stories
1 रणरणत्या उन्हात पाणी अन् पोटासाठी संघर्ष
2 दुष्काळाच्या दाहकतेचे ग्रामीण भागात अधिक चटके
3 राज ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या सभांची उत्सुकता
Just Now!
X