यादीत मेशी फाटा नाही; १०७ ठिकाणी कायमस्वरुपी उपायांचा प्रयत्न

नाशिक : शहर, ग्रामीण भागातील रस्त्यांवर काही विशिष्ट ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांचा धोका संपुष्टात आणण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीने जिल्ह्यात विविध मार्गावर सर्वेक्षणाअंती तीन वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या १०७ ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात अपघाती क्षेत्रांवर  कायमस्वरूपी उपाय योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाटा येथे मंगळवारी भीषण अपघात झाला, ते ठिकाण या यादीत नव्हते. जिल्ह्य़ातील अशी धोकादायक ठिकाणे अर्थात अपघाती क्षेत्र नव्याने शोधण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.

दरवर्षी जिल्ह्यात वाहन अपघातांमध्ये शेकडो जणांना प्राण गमवावे लागतात. सुरक्षित वाहतुकीसाठी जनजागृती होत असली तरी नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मद्यपान करून वाहन चालविणे, भरधाव वेग, पुढे जाण्यासाठीची चढाओढ, चालकाचे नियंत्रण सुटणे, धोकादायक वळण, रस्त्यावरील दोष, रस्ता ओलांडण्यासाठी आकलन न करता केलेली व्यवस्था अशी नानाविध कारणे अपघातांना नियंत्रण देणारी ठरतात. दिवसागणिक वाढणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रस्ता

सुरक्षा समितीने तीन वर्षांपूूर्वी जिल्ह्यतील सर्व मार्गावरील अपघाती क्षेत्र शोधण्यात आले होते. अनेक महिने चाललेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यत १०७ अपघाती क्षेत्र असल्याचे उघड झाले. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील ४१, राज्य मार्गावरील ३५ आणि महामार्ग वगळता महापालिका, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांवर ३१ अपघाती क्षेत्राचा समावेश आहे. अपघात झाला की, तात्पुरते उपाय करून वेळ मारून नेण्याकडे शासकीय यंत्रणेचा कल असतो. त्यामुळे अशा ठिकाणी अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपायाची प्रक्रिया या माध्यमातून सुरू झाली.  ही ठिकाणे पोलिसांच्या सहकार्याने प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केली असली तरी उपाय योजना मात्र त्या रस्त्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या संबंधित विभागांकडे सोपविण्यात आली आहे. अपघाती क्षेत्र निश्चितीनंतर पहिल्या टप्प्यात तातडीचे उपाय म्हणून संबंधित क्षेत्रात पट्टे मारणे, सूचना फलक, रिफ्लेक्टर बसविणे आदी तात्पुरते उपाय करण्यात आले होते. नंतरच्या टप्प्यात कायमस्वरुपी उपायांवर भर देण्यात आला. सर्वेक्षणात प्रत्येक अपघाती क्षेत्राचा अभ्यास करण्यात आला होता. काही ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गावर चुकीच्या ठिकाणी दुभाजकात ठेवलेली जागा तर काही ठिकाणी तीव्र वळणामुळे अपघात घडत असल्याचे कारण पुढे आले. त्या त्या क्षेत्राची कारणे लक्षात घेऊन उपाय निश्चित करण्यात आले होते.

जिल्ह्य़ातील अपघाती क्षेत्राची यादी आणि कायमस्वरुपी उपायांवर येणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधून प्रस्ताव सादर करण्यात आला. शहरातही काही अपघात प्रवण क्षेत्र आहेत. अपघाताचे धोके कमी करण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूलाची लांबी विस्तारण्याची योजना हा त्याचाच भाग आहे. या मार्गावरील रासबिहारी शाळेलगतचा चौक, जत्रा हॉटेललगतचा चौक या ठिकाणी भुयारी मार्गाद्वारे स्थानिकांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाटा अपघाती क्षेत्रात समाविष्ट नव्हते. यामुळे तिथे कोणत्याही उपाययोजना झाल्या नव्हत्या. अपघातास कारक ठरणाऱ्या अशा क्षेत्रांचा नव्याने शोध घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

अपघाती क्षेत्र म्हणजे काय ?

एखाद्या रस्त्यावरील ५०० मीटरच्या पट्टय़ात तीन वर्षांत पाच अपघात झाले असतील आणि त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असल्यास ते अपघाती क्षेत्र अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ मानले जाते. ही ठिकाणे शोधण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांकडील अपघातांची माहिती घेतली जाते. त्याआधारे अपघात नेमक्या कोणत्या ठिकाणी झाले, याची माहिती संकलित करून उपरोक्त निकषानुसार अपघाती क्षेत्र निश्चित केले जाते. अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन तो धोका कमी करण्यासाठी त्या त्या ठिकाणी काय उपाय करायला हवे याचा अपघात क्षेत्रनिहाय स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर ६२ अपघाती क्षेत्र होते. त्यातील सात क्षेत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यावरील होते. सात ठिकाणी रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. उर्वरित ४८ पैकी ४२ अपघाती क्षेत्रांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरुपी उपाय केले आहेत. सध्या सहा अपघाती क्षेत्रांवर कायमस्वरुपी उपाययोजनांचे काम सुरू आहे.

– रणजित हांडे (मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग)