News Flash

‘मध्यवर्ती रुग्णशय्या आरक्षण’ प्रणालीने संभ्रम

प्राणवायू पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे स्थिती गंभीर

प्राणवायू पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे स्थिती गंभीर

नाशिक : प्राणवायू तसेच व्हेंटिलेटरसज्ज खाटा मिळत नसल्याने काही रुग्णांना प्राण गमवावे लागले असताना महापालिकेच्या मध्यवर्ती रुग्णशय्या आरक्षण प्रणालीतील रिक्त शय्यांच्या माहितीमुळे संभ्रमात अधिकच भर पडत आहे. महापालिकेच्या प्रणालीत मंगळवारी सायंकाळी व्हेंटिलेटरसज्ज ८४, अतिदक्षता विभागात १५८ तर प्राणवायूच्या ६१३ खाटा रिक्त असल्याची माहिती दर्शविली गेली. तथापि, शय्या मिळवण्यासाठी नातेवाईकांना खासगी, महापालिका, शासकीय रुग्णालयांत वणवण करावी लागते. परंतु, कुठेही खाट मिळत नाही. प्राणवायूचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे खासगी रुग्णालये रुग्णांना दाखल करण्यास तयार नाहीत. त्यामुळे खाटा रिक्त दिसत असून रुग्णांना खाट मिळत नाही. यामुळे गैरसमज निर्माण होत असल्याचे महापालिकेने मान्य केले.

चेतनानगर येथील ७३ वर्षांच्या वृध्द महिलेसाठी नातेवाईकांनी दोन ते तीन दिवस महापालिकेसह शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये खाट शोधण्यासाठी धडपड केली. कुठेही खाट मिळत नसल्याने रुग्णास सिडकोतील काळजी केंद्रात दाखल करण्यात आले. गंभीर रुग्णांना केंद्रात ठेवण्यास परवानगी नाही. त्यामुळे केंद्राने रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्याचा तगादा लावला. या कोंडीत नातेवाईकांचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी रात्री संबंधित महिलेचे निधन झाले. रुग्णालयात शय्या न मिळाल्याने उपचाराअभावी वृध्देला प्राण गमवावे लागले. अन्य एक कुटुंब पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात आपल्या रुग्णासाठी शय्या मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्या रुग्णालयाने प्रथम दोन लाख रुपये आगाऊ रक्कम भरण्याची अट ठेवली. अन्य एका कुटुंबाने आगाऊ पैसे भरूनही शय्या मिळत नसल्याची तक्रार केली.

गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळावे, म्हणून महापालिकेने मध्यवर्ती रुग्ण शय्या आरक्षण प्रणालीची व्यवस्था कार्यान्वित केली. त्यासाठी मदत वाहिनीवर दररोज शेकडो नातेवाईक संपर्क साधतात. पण, किती जणांना शय्या मिळते हा प्रश्न आहे. खाटांची व्यवस्था अपुरी पडल्याने महापालिका, जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी हात वर करतात. खाटा शिल्लक नसल्याचे त्यांच्याकडून मान्य केले जाते. या स्थितीत महापालिकेच्या प्रणालीतून भलतीच माहिती समोर येत आहे. प्राणवायू पुरवठा विस्कळीत झाल्याचा विपरित परिणाम खाट आरक्षण प्रणालीवर झाला आहे.

२४७८ शय्या रिक्त

महापालिकेच्या मध्यवर्ती खाट आरक्षण प्रणालीत मंगळवारी सायंकाळी शहरातील १७५ करोना रुग्णालयातील ७६७७ खाटांपैकी ५१९९ खाटांवर रुग्ण उपचार घेत असून उर्वरित २४७८ खाटा रिक्त असल्याचे दर्शविलेले आहे. यात सर्वसाधारण ३१७५ पैकी १६२३ रिक्त, प्राणवायूसज्ज २९२० पैकी ६१३, अतिदक्षता विभागातील ८९३ पैकी १५८, व्हेंटिलेटरच्या ६९० पैकी ८४ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध असल्याचे दर्शविण्यात आले आहे. करोना काळजी केंद्रात २२७० पैकी १२०० खाटा उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. तशीच स्थिती डीसीएचसी आणि डीएचसीची आहे.

शहरातील १५० रुग्णालयांमध्ये तीन दिवसांपासून प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णालये नवीन रुग्णांना दाखल करून घेत नाही. प्राणवायू मिळत नसताना ते रुग्णांना दाखल करून काय देणार, हा प्रश्न आहे. प्रणालीतील माहितीवरून गैरसमज होऊ शकतात. कारण प्रणालीत खाट रिक्त दिसतात. नातेवाईकांनी संपर्क साधल्यावर प्रत्यक्षात रुणालये दाखल करून घेत नाही. प्रणालीबाबत आजपर्यंत तशा तक्रारी आल्या नव्हत्या. द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा होत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली. प्राणवायू पुरवठा सुरळीत झाल्यानंतर रुग्णांना खाटनिहाय आरक्षण देता येईल.

– सुरेश खाडे (अतिरिक्त आयुक्त, महापालिका)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 2:59 am

Web Title: relative confused over vacant beds in central bed reservation system of nashik municipal corporation zws 70
Next Stories
1 एससीजी मानवता रुग्णालयावर हल्ला
2 रुग्णांना मार्गदर्शन करणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर!
3 लोहमार्ग पोलिसांमुळे वृद्धाला जीवदान
Just Now!
X