मदत वाहिनीवर दररोज ४०० दूरध्वनी; खाटांसाठी सर्वाधिक संपर्क

नाशिक : शहरातील खासगी रुग्णालयात प्राणवायू, कृत्रिम श्वसनयंत्रणा तसेच अतिदक्षता विभागात नव्याने ७३९ खाटांची व्यवस्था करीत एकूण क्षमता वाढविली गेल्याचे महापालिकेने म्हटले असले तरी खासगी रुग्णालयात एक खाट मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. पालिकेच्या मदत वाहिनीवर दररोज तब्बल ३०० ते ४०० दूरध्वनी येत असून त्यातील १०० ते १२५ केवळ खाटा मिळविण्यासाठी असतात.

शक्य तिथे संबंधितांना खाट देण्याचा प्रयत्न होत असला तरी रुग्णास अतिदक्षता विभागात खाट मिळणे दिवसागणिक अवघड होत असल्याचे चित्र आहे.

तीन दिवसांत शहरातील १० खासगी रुग्णालयांत दोन टप्प्यांत प्राणवायू, कृत्रिम श्वसनयंत्रणा आणि अतिदक्षता विभागातील ७३९ खाटा करोनासाठी आरक्षित  करण्यात आल्या आहेत.  यामध्ये पहिल्या टप्प्यात ५०४ तर, दुसऱ्या टप्प्यात २३५ खाटा वाढविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.

पालिकेच्या माहितीनुसार शहरात महापालिका आणि खासगी याप्रमाणे एकूण ११९ रुग्णालयांमध्ये ४५६५ खाटा आहेत. त्यातील २४८४ खाटांवर रुग्ण असून उर्वरित दोन हजार ८१ खाटा रिक्त आहेत. यात प्राणवायूची व्यवस्था असणारे

१९९९ पैकी ९९९, कृत्रिम श्वनयंत्रणायुक्त ४६४ पैकी २६८, अतिदक्षता विभागातील ६५५ पैकी २५५ आणि सर्वसाधारण १४७५ पैकी ५५९ खाटा रिक्त असल्याचे म्हटले आहे. मात्र इतक्या मोठय़ा संख्येने जर खाटा रिक्त आहेत, तर नातेवाईकांना खाटांसाठी धावपळ का करावी लागते, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

खाटांच्या मध्यवर्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेने मदत वाहिनी कार्यान्वित केली आहे. अहोरात्र कार्यरत असणाऱ्या मदत वाहिनीवर दररोज ३०० ते ४०० जण संपर्क साधत आहेत. १०० ते १२५ दूरध्वनी रुग्णालयात खाट मिळविण्यासाठी असतात. ज्या ठिकाणी खाट उपलब्ध असते, तिथे संबंधित रुग्णाची व्यवस्था केली जाते, असे मदत वाहिनीची व्यवस्था सांभाळणाऱ्यांकडून सांगण्यात आले. काहींना औषधांबाबत माहिती हवी असते तर काहींना निर्जंतुकीकरण करून हवे असते.

संबंधितांना आवश्यक ते क्रमांक उपलब्ध केले जातात. खाटांची संख्या वाढविली जात असली तरी खासगी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र वेगळेच अनुभव येत आहेत.

खाटांचा विस्तार

पंचवटीतील सद्गुरू, गंगापूर रस्त्यावरील उपाध्ये, नाशिकरोड येथील डॉ. भुतडा मॅटर्निटी आणि गुजराथी, म्हसरूळ येथील सोमानी, अशोक स्तंभ येथील देवरे या सहा रुग्णालयात प्राणवायु, व्हेंटिलेटरयुक्त आणि अतिदक्षता विभागातील एकूण ७५ खाटा करोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच अशोका मेडिकव्हर, वोक्हार्ट, अपोलो, सूर्योदय या चार रुग्णालयात आधी २०० खाटा करोनासाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. तेथील आणखी १६० वाढीव खाटा करोनासाठी आरक्षित करण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी म्हटले आहे.