रुग्ण आणि नातेवाईकांचाही जीव टांगणीला

नाशिक : प्रशासनाच्या मध्यवर्ती कक्षातून रुग्णालयांना पुरेसे इंजेक्शन मिळत नाही. डॉक्टर नातेवाईकांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवितात. काही रुग्णालयांना वितरण झाल्याचे दाखविले जाते. तिथपर्यंत ते पोहोचत नाहीत. या व्यवस्थेत मधल्या मध्ये कोणी ते गायब करीत आहे काय, असा संतप्त प्रश्न नातेवाईक विचारत आहेत. करोनाचे संकट गडद होत असताना रुग्णांसह नातेवाईकांची रेमडेसिविरसह प्राणवायूसाठी आजही फरफट होत आहे.

महिनाभरापूर्वी रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रेमडेसिविरसाठी लांबच लांब रांगा औषध दुकानांसमोर लागत होत्या. या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. यावर उपाय म्हणून प्रशासनाने मध्यवर्ती कक्ष स्थापून थेट रुग्णालयांना इंजेक्शन वितरणाची व्यवस्था केली.

याच काळात रेमडेसिविरचा पुरवठा कमी झाला. सध्या साडेसहा हजार ते सात हजार रुग्णांसाठी रेमडेसिविरची मागणी असते, पण केवळ ५०० ते हजार उपलब्ध होत आहेत. विहित व्यवस्थेत मागणी करूनही रुग्णालयांना इंजेक्शन मिळत नसल्याने आजही नातेवाईकांची वणवण कायम आहे.  रेमडेसिविरसाठी सोमवारी अनेक रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यातील हेमंत धारक यांनी प्रशासनाच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित केली. सात दिवसांपासून रुग्ण उपचार घेत आहे. प्राणवायूचा पुरवठा नसल्याने त्यास खासगी रुग्णालयात नेले. रुग्णालयाने मध्यवर्ती कक्षाला मेल केले, पण ते मिळाले नाहीत. कक्ष अधिकारी आज २०० इंजेक्शन उपलब्ध असून सात हजार जणांची मागणी असल्याचे सांगतात. या स्थितीत कोणाकोणाला देणार, असा प्रश्न करतात. मुळात रुग्णालयांमध्ये लेखा परीक्षक कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत इंजेक्शन वितरणावर लक्ष देता येईल. २५ एप्रिल रोजी किती इंजेक्शन आली, कोणाला दिली याचा अहवाल प्रशासन देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

एका खासगी रुग्णालयास इंजेक्शन दिल्याचे यादीत दर्शविले जाते.  प्रत्यक्षात त्या रुग्णालयास इंजेक्शन मिळत नाही. इंजेक्शनचा गैरव्यवहार होत असल्याची तक्रार त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. अन्य एका रुग्णाचे नातेवाईक नीलेश जाधव यांनी रेमडेसिविरबाबत प्रशासन-रुग्णालय यांच्याकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप केला. इंजेक्शन मिळत नसल्याने

रुग्णालय नातेवाईकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जायला सांगतात, पण इथे कोणी अर्जसुद्धा घेत नाही. पूर्ण यादी दिली जात नाही. रुग्णालयांना पुरेसे इंजेक्शन दिले जात नसून त्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. दरम्यान, नातेवाईकांच्या या आक्षेपांबाबत मध्यवर्ती कक्षाचे प्रमुख शिवकुमार आवळकंठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क झाला नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा अतिशय कमी असल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.  तसेच राज्य कृती दलाच्या निर्देशानुसार या इंजेक्शनशिवायही रुग्णाला वाचविता येते. करोनाबाधित रुग्णाला हे इंजेक्शन द्यायचे की नाही हे तज्ज्ञ डॉक्टरांनी निश्चित करावे, असा आग्रह दलाने धरल्याचा वैद्यकीय संघटनाचा दाखला पुढे केला जात आहे.

प्राणवायूसाठी १८ तास वणवण

भाऊ दवाखान्यात आहे. घरी लहान मुलांना ठेवून आम्ही काल प्राणवायूसाठी सकाळी ७ ते पहाटे ३ वाजेपर्यंत फिरफिर करीत होतो. रेमडेसिविर इंजेक्शन औषध दुकान अन्यथा रुग्णालयात मिळेल असे सांगितले जाते, पण ते मिळत नाही. डॉक्टरही मदत करीत नाही. आम्ही हातावर पोट भरणारे आहोत. शिवणकामाची दुकाने आहेत. वर्षभरापासून काम बंद आहे. सर्वसामान्यांना इंजेक्शन मिळणार नसतील तर आम्ही काय करायचे?

–  शुभांगी कापूरे (रुग्णाची बहीण)