तिसरी घंटा कधी वाजणार? : नाशिककरांना उत्सुकता

नाशिक : शहराचा सांस्कृतिक आरसा असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर नाटय़मंदिराचा दुरुस्तीनंतर उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप ठरला नसला त्यादृष्टीने पावले टाकताना  त्याची चाचपणी करण्यात आली. आता नाटय़मंदिराची तिसरी घंटा कधी वाजणार याची उत्सुकता नाशिककरांना लागली आहे.

महाकवी कालिदास कलामंदिराचे साडेनऊ कोटी रुपये खर्च करून त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी नाटय़मंदिर, महात्मा फुले कलादालनाची अलीकडेच त्याची पाहणी केली होती. तांत्रिक बाजू तपासत या वास्तू ताब्यात घेऊ, अशी सूचना त्यांनी त्यावेळी केली. कालिदास दिनाचे औचित्य साधत नाटय़मंदिराचे उद्घाटन व्हावे असा मतप्रवाह असतांना काहींनी धुमधडाक्यात नाटय़मंदिराचा उद्घाटन सोहळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मध्यंतरी आचारसंहिता तर कधी अपूर्ण कामे यामुळे दूरुस्तीनंतर उद्घाटनाचा मुहूर्त लागत नव्हता.

त्यातच राजकीय श्रेयवादाचे रंगणारे युध्द पाहता होणारा गोंधळ कार्यक्रमाला मारक ठरेल अशी शक्यता असल्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम आयुक्तांनी घेण्याचे टाळल्याचे सांगितले जाते. मात्र अनेकांची अपेक्षा असलेल्या कालिदास दिनाचे औचित्य साधत दुरुस्तीनंतरच्या नाटय़मंदिराचे उद्घाटन करण्याऐवजी त्या दिनानिमित्त महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाटय़मंदिरात  शुक्रवारी शिक्षण विभागाशी संबंधित  शैक्षणिक संस्था पदाधिकारी, खासगी,  महापालिका शाळा मुख्याध्यापक आणि  शिक्षकांची बैठक घेत नाटय़मंदिराची तांत्रिक चाचपणी केली. रंगमंचावर सरस्वतीच्या पूजकांशी त्यांनी संवाद साधला आणि नाटय़ मंदिराची तिसरी घंटा लवकरच वाजण्याचे संकेत दिले. आयुक्तांसोबत नव्या वास्तूत चर्चा करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाल्याने शिक्षक भारावून गेले होते.  कालिदासचे हे वैभव टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे आणि ती आपण नेटाने पार पाडू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाटय़मंदिराची पालिकेनेच जबाबदारी घ्यावी

संस्थेच्या वतीने याआधी नाटय़मंदिरात अनेक कार्यक्रम झाले असले तरी त्यावेळी वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. नुतनीकरणात आवाज, प्रकाश या सर्व बाबींविषयी समाधान वाटले.  स्वच्छतागृहातील स्वच्छता, व्यवस्था चांगली आहे. महापालिकेने कुठल्याही मध्यस्थीशिवाय नाटय़मंदिराची जबाबदारी घ्यावी, जेणेकरून कोणाची आर्थिक लुबाडणूक होणार नाही.

-राजेंद्र निकम, मुख्याध्यापक, सागरमल मोदी शाळा

बदल सुखावह

कालिदास कलामंदिर शहराचे वैभव असून नूतनीकरणानंतर या वास्तूत येण्याचा पहिला मान शिक्षकांना मिळाला, याचा आनंद वाटत असल्याचे नमूद केले. कलामंदिरात अंतर्बाह्य़ बदल झाले असून ते सुखावह आहेत. तांत्रिक, आसन व्यवस्था, प्रकाश योजना, वातानुकूलित यंत्रणा, स्वच्छतागृह याविषयी कुठलीच तक्रार नाही. फक्त वाहनतळाचा प्रश्न तेवढा सोडवा.

प्रतिभा सोनार,  मराठी शाळा, जेलरोड