News Flash

कादवा नदीत अडकलेल्या तिघांची सुटका

सततच्या पावसामुळे पालखेड धरणातून सोमवारी दुपारी पाणी सोडण्यात आले.

पालखेड धरणातून पाणी सोडताना पूर्वसूचना न मिळाल्याने अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे कादवा नदीकाठावरील गावांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे मातीच्या भरावावर अडकून पडलेल्या तीन जणांना मध्यरात्री बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. या मदतकार्यात सैन्य कर्मचाऱ्यांची तुकडी आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकासह काही कार्यकर्त्यांचा समावेश होता.

सततच्या पावसामुळे पालखेड धरणातून सोमवारी दुपारी पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्याबाबत पूर्वसूचना दिली गेली नाही. त्याचा फटका कादवा नदीकाठावरील भागास बसला. कादवा आणि पालखेड या दोन्ही पात्रांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याचा अंदाज नसल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार सुरू होते. कुंदेवाडी येथे एका लग्न सोहळ्यासाठी परिसरातील चंदेवाडी येथील मांगीलाल वामन माळी (३१), रवींद्र सुरेश सूर्यवंशी (३०) व केदू रंगनाथ पवार (२८) हे आले होते. दुपारी लग्न सोहळा आटोपल्यानंतर आपल्या मूळ गावी जात असताना ते नदी पात्राकडे आले. त्या वेळी त्या भागातील दोन मोऱ्यांचे पाणी सोडले होते. पात्र ओलांडण्यास ठरावीक अंतर बाकी असल्याने त्यांना आपण हे अंतर सहज पार करू असे वाटले. मात्र अवघ्या काही मिनिटांत कादवा व पालखेड धरणातून झालेल्या पाण्याचा विसर्ग पाहता हे तिघेही चारही बाजूने पाण्याच्या वेढय़ात अडकून पडले. पुढे जाण्याच्या प्रयत्नात पात्रालगतच्या मातीच्या ढिगाऱ्यावर ते उभे राहिले. पाण्याच्या वाढत्या पातळीबरोबर भराव खचू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. सायंकाळी उशिराने हा प्रकार लक्षात आल्यावर अंधारामुळे मदतकार्यात अडचणी आल्या.

त्यांच्या बचावासाठी पथकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. मंगळवारी रात्री अडीच वाजता एनडीआरएफचे पथक, सैन्य दलातील ५० कर्मचारी, नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांतून त्या तिघांची सुटका झाली. पाण्याचे रौद्र रूप पाहता तिघांची पाचावर धारण बसली होती. सुखरूप सुटका झाल्यानंतर त्यांना अश्रू रोखणे अवघड झाले. दुसरीकडे परिसरातील झनकर यांनी आपल्या काही गायी चरण्यासाठी नदी काठावर आणल्या होत्या. पाण्याचा वेग पाहून झनकर बंधू बाहेर आले, पण गायी पुरात अडकल्या. पाण्याची पातळी कमी झाल्यावर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:01 am

Web Title: rescued three person who stranded in kadwa river
Next Stories
1 धरणांच्या जलसाठय़ात समाधानकारक वाढ
2 भाजीपाला दुपटीने महाग
3 ‘बॉश’च्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिक ढोल
Just Now!
X