निवडणुकीत पाण्याचा मुद्दा केंद्रस्थानी; शहरवासीयांची साठवणुकीसाठी धडपड

अनिकेत साठे, नाशिक

नाशिकसह संपूर्ण राज्यात यंदा मुसळधार पाऊस झाला. बहुतांश धरणे ओसंडून वाहिली. अनेक शहरे-गावांवरील टंचाईचे संकट दूर सारले गेले. अपवाद राहिला तो, सव्वा लाख लोकसंख्येच्या मनमाडचा. नांदगाव मतदारसंघातील या शहरात आजही १६ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. सध्या इतक्या कालखंडाने पाणीपुरवठा होणारे हे राज्यातील एकमेव शहर असावे.

नगरपालिका तासभर पाणी देते. त्यात प्रत्येक कुटुंबास तीन ते चार हजार लिटरचा साठा करावा लागतो. आर्थिक क्षमता असणारी काही कुटुंबे महिन्याकाठी एक-दीड हजार रुपये शुद्ध पाण्यासाठी खर्च करतात. उर्वरितांना साठविलेल्या पाण्यावर गुजराण करावी लागते. नांदगाव मतदारसंघाची प्रत्येक विधानसभा निवडणूक पाणी प्रश्नाभोवती फिरते. मात्र, तो सोडविण्याच्या दिशेने ठोस पावले पडत नाहीत.

मध्य रेल्वेच्या मार्गावरील मनमाड हे प्रमुख स्थानक. रेल्वे सामग्रीचा कारखाना, अन्न महामंडळाचे गोदाम, इंधन कंपन्यांचे साठवणूक केंद्र असे बरेच काही या परिसरात आहे. नाही ते केवळ पाणी.  मनमाडमधील कोणत्याही घरात भेट दिल्यावर ते लक्षात येते. तिथे एक वेळ गृहोपयोगी, सजावटीच्या, आरामदायी वस्तू नसतील. दिसतील त्या केवळ ५००, हजार लिटरच्या प्लास्टिक टाक्या. घर बांधतानाच तळघरात टाकीची व्यवस्था केली जाते. १५ ते २० दिवस पुरेल इतक्या पाण्याची साठवणूक करणे, ही प्रत्येकाची धडपड. गेल्या मे महिन्यात ३१ दिवसांनी शहरवासीयांना नळाचे पाणी मिळाले होते. ‘प्रत्येक कुटुंब महिनाभराचा किराणा भरून ठेवते, तसेच आम्ही पाणीही भरून ठेवतो,’ अशी प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटते.

पाण्याची चोरी पण..

नळाला तासभर येणारे पाणी आपल्या टाकीत खेचण्यासाठी प्रत्येकाने तजवीज केलेली आहे. ज्या दिवशी, ज्या भागात पाणीपुरवठा होणार आहे, तेथील कुटुंबातील सदस्य कितीही महत्त्वाच्या कामात असो, त्याला घरी पळावेच लागते. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील नांदगाव हा दुष्काळी परिसर. मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांपासून बहुतांश धरणे ओसंडून वाहत आहेत.  मनमाडला पाण्याचा स्रोत नाही. पांझण नदीवरील वाघदर्डी बंधाऱ्यातून शहरास पाणी दिले जाते. पालखेड धरण समूहात मनमाडसाठी पाणी आरक्षित आहे. नोव्हेंबरपासून कालव्यातून पिण्याचे आवर्तन सोडले जाते. हे आवर्तन पोहचेपर्यंत ८६ किलोमीटरच्या प्रवासात पाण्याची मोठय़ा प्रमाणात चोरी होते. कधी तरी गुन्हा दाखल होतो. पण, पाणी चोरी थांबत नाही. सलग दोन वेळा नांदगावचे प्रतिनिधित्व पंकज भुजबळ यांनी केले आहे.