शहरातील पहिला तर, जिल्ह्य़ातील दुसरा करोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर यंत्रणेने रुग्णाचे निवासस्थान असलेले मनोहरनगर केंद्रस्थानी ठेवत तीन किलोमीटरचा परिसर १४ दिवसांसाठी बंदिस्त केला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १४ व्यक्तींनाही महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

जिल्ह्य़ातील लासलगाव परिसरात १० दिवसांपूर्वी करोनाग्रस्त रुग्ण आढळला होता. त्यानंतर सोमवारी सायंकाळी शहराच्या गोविंदनगर परिसरातील मनोहर नगरात ४४ वर्षांचा रूग्ण करोनाग्रस्त असल्याचे उघड झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या संपर्कात आलेले त्याचे कुटुंबिय तसेच अन्य जवळच्या व्यक्ती अशा १४ संशयित रुग्णांना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंद नगर, मनोहरनगर केंद्रस्थानी ठेवत तीन किलोमीटरचा परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. हा संपूर्ण परिसर निर्जतुक करणे सुरू असून या ठिकाणी २३ वैद्यकीय पथके काम करत आहेत. आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून येथे घराघरात जावून सव्‍‌र्हेक्षण सुरू असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. याठिकाणी सर्दी, खोकला, ताप असलेला रुग्ण आढळल्यास त्यांच्या थुंकीचे नमुने घेत त्यांना घरीच विलगीकरण करण्यात येणार असल्याचे त्र्यंबके यांनी नमूद केले.

दरम्यान, करोनाग्रस्त आढळलेल्या परिसराची तीन किलोमीटरची त्रिज्या कशी मोजावी याविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. महापालिका आयुक्तांनी या भागाची पाहणी करून  नव्याने नकाशातून या भागाच्या सीमांचे रेखांकन करून परिसर बंदिस्त केला. बंदिस्त करण्यात आलेल्या भागात सुमंगल सोसायटी, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान भुजबळ फार्म, डॉ. पिंप्रीकर क्लिनिक, जनहित हॉस्पिटल, श्रीयश हॉस्पिटल, झेंथ हॉस्पिटल, न्यु इरा इंग्लिश स्कूल, अश्विनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नयनतारा सीटी-दोन, भावसार भवन, युनियन बँक यांचा समावेश आहे.

समाज माध्यमातील चित्रफित

करोनाग्रस्त रुग्णाचे नाव, त्याची ओळख तसेच तो कोणाच्या संपर्कात आला ही सर्व माहिती असलेली सहा पानांची यादी समाज माध्यमात फिरत राहिली. या यादीत करोनाग्रस्त रुग्ण शहर परिसरातील कोणत्या ठिकाणी, किती वेळ फिरला याची माहितीही आहे.

सुरक्षा संचाविना आशा-अंगणवाडी सेविका

करोनाग्रस्त रुग्ण राहणारा परिसर प्रशासनाने बंदिस्त केला. या ठिकाणी आरोग्य विभागाकडून तपासणी आणि सव्‍‌र्हेक्षण केले जात आहे. आशा-अंगणवाडी सेविकांना सुरक्षा साहित्य संच नसल्याने प्लास्टिकच्या पिशव्या हातात आणि डोक्यावर घालून त्यांना काम करावे लागत आहे.