ऑनलाइन, दूरध्वनीद्वारे तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन

नाशिक : महापालिकेशी संबंधित जवळपास १६ जण करोनाबाधित आढळल्याने आणि त्यातील एकाचा मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, महापालिका मुख्यालयाचे कामकाज आवश्यक ती दक्षता, अनावश्यक प्रवेशावर निर्बंधआणून सुरू ठेवण्यात आले आहे. संपूर्ण इमारत प्रतिबंधित क्षेत्र होणार असल्याच्या अफवेत तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. महापालिका प्रतिबंधित क्षेत्र होणार नाही. केवळ नगररचना विभाग बंद करण्यात आला आहे. आयुक्त कार्यालयातील एक जण सकारात्मक आढळल्यानंतर या कार्यालयाचे र्निजतुकीकरण करून कर्मचारी बदलण्यात आले. मुख्यालयातील एकच प्रवेशद्वार खुले ठेवून इतरांचे प्रवेश नियंत्रित करण्यात आले. नागरिकांसह नगरसेवकांनी अनावश्यक महापालिकेत येऊ नये, असे आवाहन गमे यांनी केले आहे.

शहरात करोनाचा वेगाने होणारा फैलाव महापालिका, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचला आहे. जवळपास १६ जणांना प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले. यात आयुक्तांचा स्वीय सहाय्यक, पालिकेच्या रुग्णालयातील परिचारिका, सुरक्षारक्षक, लिपीक असे १० आणि तीन वाहनचालकांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी कंपनीतील ३३ वर्षांच्या करोनाबाधिताचा मृत्यू झाला. या घटनाक्रमामुळे महापालिकेच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.

महापालिका मुख्यालयाची इमारत प्रतिबंधित क्षेत्र झाल्याच्या अफवा पसरल्या. नगररचना विभागातील कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने हा विभाग बंद करून त्याच्या संपर्कातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले. आवश्यक त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल नकारात्मक आले. इतरांचे गृह विलगीकरण करून त्यांची वैद्यकीय देखरेख केली जात आहे. आयुक्तांच्या स्वीय सहायकालाही संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेतले गेले. आयुक्त कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याच्या खोलीचे र्निजतुकीकरण  करण्यात आले. आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी तातडीने बदलण्यात आले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल चांगले असल्याचे गमे यांनी सांगितले.

करोनाने मुख्यालयात प्रवेश केल्याच्या वृत्ताने अन्य विभागातील कर्मचाऱ्यांसह राजकीय वर्तुळात अस्वस्थता आहे. महापालिकेत कोणी फारसे फिरकले नाही. आयुक्तांनी कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू ठेवले. महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानाचे प्रवेशद्वारही बंद होते. महापालिकेतील वर्दळ एकदमच कमी झाली.

एकच प्रवेशद्वार खुले

महाालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये प्रवेशासाठी चार प्रवेशद्वार आहेत. वाहने उभी करून कोणत्याही प्रवेशद्वाराने इमारतीत जाता येते. परंतु, आता मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर प्रवेशद्वार बंद करण्यात आली आहेत. मुख्यालयात ६०० ते ७०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत असतात. लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा वावर असतो. मुख्यालयात गर्दी टाळणे महत्वाचे आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी व्यस्त असणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी सकारात्मक झाल्यास अडचणी निर्माण होतील. अनावश्यक कोणीही महापालिकेत येऊ नये, असे पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. संपूर्ण शहराचे काम मुख्यालयातून चालते. ते सुरळीत राखण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी ऑनलाइन, दूरध्वनीद्रारे कराव्यात. त्याची दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.