गणेशोत्सवावर करोनासह मंदीचे सावट

नाशिक : गणपतीबाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाही यंदा बाजारपेठेत विशेष धामधूम दिसत नाही. करोनामुळे आलेली आर्थिक मंदी, पावसाचा सुरू असलेला खेळ आणि प्रशासनाची नियमावली

यामुळे नागरिकांनी यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ विक्रेत्यांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

करोनाचा कहर दिवसागणिक वाढत आहे. रुग्णसंख्येचा आणि मृत्युदराचा आलेख उंचावत असताना करोनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यावसायिकांपुढे सावरण्याचे आव्हान आहे. मार्चपासून लागू झालेली टाळेबंदी, त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सण, उत्सव हे मदतीचा हात पुढे करतील, अशी अपेक्षा किरकोळ विक्रेत्यांना होती; परंतु दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या, लोकांच्या मनातील भीती, यामुळे करोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर किरकोळ विक्रेत्यांनी सजावटीसाठी लागणाऱ्या माळा, अन्य साहित्य हे व्याजाने पैसे घेऊन जमा केले. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसह अन्य भागांतील विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा कायम आहे. याविषयी किरकोळ विक्रेत्या शारदा महाले यांनी आपली व्यथा मांडली. करोनामुळे प्रवासी वाहतूक बंद आहे. बँकेत जमा असलेली पुंजी, व्याजाने घेतलेले पैसे असे मिळून ५० हजारांचा माल गावातूनच घाऊक व्यापाऱ्याकडून खरेदी केला. गाळ्याचे भाडे परवडत नसल्याने बाहेरच रस्त्याच्या कडेला उभे राहून हे सामान विकण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु संततधारेमुळे माल खराब होत आहे.

संध्याकाळी खरेदीसाठी लोक बाहेर पडतात तोच पोलीस, महापालिकेकडून दुकाने बंद करण्यास सांगितले जाते. त्यामुळे नफा जाऊ द्या, पण गुंतविलेले पैसे निघाले तरी खूप झाले. दोन दिवसांवर गणेशोत्सव आला, पण अजून माल विकला गेला नसल्याचे महाले यांनी सांगितले. मेनरोड येथील किरकोळ विक्रेते दिनेश कोरिया यांनी दरवर्षीप्रमाणे यंदा ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह नसल्याचे सांगितले. सजावटीच्या सामानात पर्यावरणपूरक सजावटीसाठी विचारणा होत आहे. करोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीचा फटका उत्सवाला बसला आहे. प्रशासनाचे नियम पाहता सद्य:स्थितीत काम कसे करता येईल, हा प्रश्न असल्याचे कोरिया यांनी सांगितले.

घरगुती गणेशोत्सवावरही परिणाम

राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर काही र्निबध लादले आहेत. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी देखावे तयार करणाऱ्यांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे घरगुती विशेष सजावट करण्याकडे अनेकांचा कल असतो. यंदा मात्र करोनाचे सावट पाहता सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या आरासाकडे बाप्पाभक्तांनी पाठ फिरवल्याने अर्थचक्राचा गाडा अधिकच रुतला आहे.