10 April 2020

News Flash

निवृत्तीनंतरही ‘बीएसएनएल’च्या कर्मचाऱ्यांची विनामोबदला सेवा

नाशिक जिल्ह्य़ातून बीएसएनएलच्या साधारण ७५ टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

(सांकेतिक छायाचित्र)

नाशिक येथे कामकाजावर कोणताही परिणाम नाही

नाशिक : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) ढासळती अवस्था पाहता कर्मचाऱ्यांपुढे स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवण्यात आल्यावर बहुतांश कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी सेवेतून बाहेर गेल्यावर त्याचा विपरीत परिणाम नाशिक येथे कामकाजावर होण्याची शक्यता लक्षात घेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विनामोबदला काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामकाजावर कुठलाही विपरीत परिणाम झालेला नाही.

नाशिक जिल्ह्य़ातून बीएसएनएलच्या साधारण ७५ टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ९२० पैकी ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. राज्यात अन्य ठिकाणी यामुळे सेवा विस्कळीत झाली. नाशिकमध्येही सेवांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र असे काहीही न होता बीएसएनएलच्या सेवा सुरळीतपणे पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. ग्राहकांची कसलीही गैरसोय होऊ नये याची काटेकोरपणे दक्षता घेतली जात आहे. सेवानिवृत्ती सोहळ्यात महाप्रबंधक नितीन महाजन यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सेवानिवृत्तांनी प्रतिसाद दिला.

निवृत्त कर्मचारी १ फेब्रुवारीपासून विनामोबदला नियमित कामावर येत असून सद्य:स्थितीत निवृत्त कर्मचारी गरज आहे तेथे काम करून बीएसएनएलची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये देयक विभाग, तांत्रिक विभाग, सेवानिवृत्तांच्या वेतनासंदर्भातील विभाग, नव्याने जोडणी, ज्या ठिकाणी नादुरुस्ती त्या ठिकाणी, अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सेवा दिली जात आहे.

प्रतिमा कायम राखण्यासाठी..

बीएसएनएलशी कामामुळे कौटुंबिक संबंध निर्माण झाले. सेवानिवृत्तीनंतर कामकाजात येणारा विस्कळीतपणा पाहता बीएसएनलची बदनामी होऊ नये यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वत:हून विनामोबदला काम करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी महाप्रबंधक नितीन महाजन यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन यामुळे हे शक्य झाले.

– गणेश बोरसे (सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 12:20 am

Web Title: retirement bsnl employees free service akp 94
Next Stories
1 गंगापूर पर्यटन संकुलातील प्रकल्प लवकरच कार्यान्वित
2 गुन्हे वृत्त : मंगळसूत्र खेचून पलायन केल्याच्या दोन घटना
3 ‘देहदान’ जनजागृतीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
Just Now!
X