परतीच्या पावसामुळे उत्पादनात घट

विक्रमी उत्पादनामुळे गेल्या वर्षी हंगामाच्या अखेरीस द्राक्षांचे भाव १० ते १२ रुपये किलोपर्यंत घसरले होते. यंदा परतीच्या पावसाचा द्राक्ष बागांना तडाखा बसला. यामुळे उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी घटणार आहे. साहजिकच त्याचा परिणाम भाव उंचावण्यात होईल. सध्याचे पोषक हवामान आणि मुबलक पाणी ही दिलासादायक बाब. सोमवारी त्यात ढगाळ वातावरणाचा अडथळा आला. हंगामाच्या प्रारंभी आधिक्याने निर्यात होणाऱ्या द्राक्षांनी महिनाभर ९० ते १२० रुपये प्रतिकिलोची पातळी कायम राखली आहे.

Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
South Mumbai Redevelopment plans
आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना

द्राक्ष उत्पादनात देशात अग्रस्थानी असणाऱ्या नाशिकमध्ये यंदा सुमारे दोन लाख एकरवर लागवड झाली आहे. त्यात थॉमसन सिडलेस, सोनाका, माणिकचमन, गणेश, शरद सिडलेस, जम्बो सिडलेस आदी वाणांचा समावेश आहे. परतीच्या पावसाने इतर पिकांप्रमाणे बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी डावणीचा प्रार्दुभाव झाला. वेलींवर पाणी राहिल्याने कुजून द्राक्ष घड गळाले. तेव्हाच्या पावसाचे दुष्परिणाम आता लक्षात येत आहेत. त्यात नव्याने ढगाळ हवामान, बेमोसमी पावसाचे सावट उभे राहिले. जून-जुलैमध्ये छाटणी झालेल्या बागांमधून सध्या द्राक्ष काढणी सुरू आहे. सटाणा तालुका हा त्याचा केंद्रबिंदू. या भागातील १२५० एकरपैकी निम्म्या क्षेत्रातील काढणी पूर्ण झाल्याचे द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक खंडू शेवाळे यांनी सांगितले. पावसामुळे रोगराई वाढून उत्पादनात २५ ते ३० टक्के घट आली. सुरुवातीचा माल विविध देशात निर्यात होतो. त्याला भावही चांगलाच मिळतो. यंदा रशिया, श्रीलंकेत माल जात असला तरी दुबईला तो गेला नाही. महिनाभरापूर्वी १०० ते १२० रुपयांदरम्यान प्रति किलोला मिळालेला भाव सध्या ८५ ते १०० रुपयांवर आला आहे. इतर भागातील माल बाजारात येईल, तसे भाव कमी होतील. या स्थितीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रारंभी १० ते १५ टक्क्यांनी कमी मिळाल्याचे त्यांनी सूचित केले. अतिशय मोठय़ा क्षेत्रात द्राक्ष लागवड करणाऱ्या दिलीप बोरसे यांच्या मते नुकसानीमुळे या हंगामात विशेष काही राहिलेले नाही. पावसाने बागा अडचणीत सापडल्या. त्यांना वाचविण्यासाठी अधिकची औषध फवारावी लागली. खर्च वाढला. उत्पादन निम्म्याने घटले. बाग लावल्यानंतर शेतकऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय नसतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कसमादे पट्टय़ाप्रमाणे निफाड, नाशिक, दिंडोरी, चांदवड तालुक्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. फुलधारणा, फळधारणेच्या अवस्थेतील बागांचे परतीच्या पावसाने असेच नुकसान झाले होते. दिवाळीनंतर वातावरण बदलले. सद्य:स्थितीत तापमान १० ते १४ अंशापर्यंत खाली आले आहे. हे वातावरण द्राक्षाला पोषक आहे. यामुळे फवारणीचे प्रमाण कमी झाले. जानेवारीपासून उपरोक्त भागातील द्राक्षे बाजारात येतील. मागणी आणि पुरवठय़ात फारसे अंतर राहणार नसल्याने भावात गतवर्षीसारखी स्थिती होणार नाही, असा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी व्यक्त केला. सध्या द्राक्ष खरेदीचे भाव पाहिल्यास किरकोळ बाजारातील त्यांच्या दराचा अंदाज येईल. जानेवारीत आवक वाढल्यानंतर द्राक्षे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील.

मागील हंगामात दोन लाख ३२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. निर्यातीच्या यादीत काही नवीन देश समाविष्ट झाल्यास हा आकडा आणखी वृद्धिंगत होईल, असे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे म्हणणे आहे. निर्यातक्षम द्राक्षांसाठी मण्यांचा आकार विहित निकषापर्यंत नेण्यासाठी संजिवके द्यावी लागतात. त्यांची गुणवत्ता राखण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. द्राक्ष हे अतिशय नाजूक पीक आहे. कमालीची उष्णता, पाऊस, अति थंड वातावरण त्याच्यासाठी हानिकारक ठरते. पहिल्या संकटातून बचावलेल्या बागांवर पुढील काळात तसे संकट न ओढवल्यास द्राक्ष भाव खातील, असे चित्र आहे.

सांगली-सोलापूरशी स्पर्धा

  • नाशिकच्या द्राक्षांचा सर्वसाधारण भाव कमी होण्यामागे आणखी एक कारण सांगितले जाते. सांगली, सोलापूर भागात उत्पादक पूर्वी द्राक्षांची लागवड प्रामुख्याने मनुका निर्मितीसाठी करायचे.
  • त्यांच्यामार्फत द्राक्षांवर संजिवकांचा वापर केला जात नव्हता. यामुळे त्या भागातील द्राक्षांची साल पातळ असे. मनुक्यांसाठी अशीच द्राक्षे लागतात.
  • आता त्या भागातील उत्पादक मनुक्यांऐवजी आपली द्राक्षे थेट बाजारात विक्रीसाठी आणत असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे निरीक्षण आहे.
  • जानेवारी ते एप्रिल या काळात आधिक्याने सर्व भागातून माल बाजारात येतो. त्यावेळी मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन बिघडले की भावावर परिणाम होतो.

ढगाळ हवामानामुळे भुरीची शक्यता

परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्य़ात एकूण उत्पादनात १० ते १५ टक्के घट होईल, असा अंदाज आहे. उत्पादकांनी द्राक्ष बागांची काळजी घेतलेली असल्याने गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही. यामुळे निर्यातीत वाढ होऊ शकते. आतापर्यंत निर्यातीसाठी ३० हजार द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरअखेपर्यंत मुदत असल्याने त्यात आणखी वाढ होऊ शकते. सध्याचे ढगाळ वातावरण काही दिवस कायम राहिल्यास भुरी रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे.

पी. एन. जगताप (कृषी अधिकारी, नाशिक)